नागपूर विभागातील प्रकल्पांतील जलसाठा महिनाभरात जवळपास २० टक्के घटला असून मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठा अध्र्यावर आला आहे. सिंचनासाठी मोठय़ा प्रमाणात होणारा पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनामुळे जलसाठय़ात वेगाने घट सुरू आहे.
विभागातील १८ मोठय़ा प्रकल्पांमध्ये सध्या ६५ टक्के, ४० मध्यम प्रकल्पांमध्ये ५५ टक्के तर ३१० लघु प्रकल्पांमध्ये ५० टक्के जलसाठा आहे. पावसाळ्याच्या अखेरीस मोठय़ा प्रकल्पांमधील जलसाठा ८७ टक्क्क्यांपर्यंत, मध्यम प्रकल्पांतील जलसाठा ७५ तर लघु प्रकल्पांतील जलसाठा ७० टक्क्क्यांपर्यंत वाढला होता. पाऊस थांबल्यानंतर जलसाठय़ात झपाटय़ाने घट होण्यास सुरुवात झाली आहे. विभागातील भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द टप्पा एक प्रकल्पाच्या सांडव्यातून डिसेंबरमध्ये दररोज ४१ क्युमेक्स जलसाठय़ाचा विसर्ग होत आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये या प्रकल्पातून १३० क्युमेक्स विसर्ग सुरू होता.
विभागातील मोठय़ा १६ प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा ऑक्टोबरमध्ये असलेला २२९६ दलघमी जलसाठा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात १९३६ दलघमीपर्यंत घटला आहे. चंद्रपूरच्या ईरइ धरणाच्या साठय़ाची स्थिती सर्वात चांगली आहे. महाजनकोच्या या धरणात आताही ९० टक्के (१४४ दलघमी) उपयुक्त जलसाठा आहे.  
नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक प्रकल्प, गोंदिया जिल्ह्य़ातील पुजारी टोला व कालीसरार, चंद्रपूर जिल्ह्य़ातील असोलामेंढा आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील दिना प्रकल्पातील जलसाठय़ात मोठय़ा प्रमाणात घट झाली असून आता केवळ ३२ टक्क्यांपर्यंतच साठा राहिला आहे. भंडारा जिल्ह्य़ातील बावनथडी प्रकल्पातही केवळ २२ टक्के  (४८ दलघमी) जलसाठा आहे.
विभागातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील साठय़ाचा सिंचनासाठी वापर होत असल्याने महिनाभरात साठा २० टक्क्याने घटला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा ३१० दलघमी आणि लघु प्रकल्पांमध्ये २५१ दलघमी उपयुक्त साठा आहे.