प्रबोधनकार ठाकरे स्मृती प्रतिष्ठानचे नंदिग्राम भूषण पुरस्कार यंदा डॉ. साहेबराव मोरे व पत्रकार संजीव कुळकर्णी यांना जाहीर झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. धर्मभूषण, अॅड. दिलीप ठाकूर यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
सांस्कृतिक कार्यासाठी संजीव कुळकर्णी व प्रशासकीय सेवेसाठी मनपाचे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव मोरे यांची पुरस्कारासाठी निवड झाली. यापूर्वी नांदेड भूषण पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे, प. पू. जगदीशमहाराज, कॉ. अनंत नागापूरकर, प्राचार्य गो. रा. म्हैसेकर, डॉ. बाळासाहेब साजणे, त्र्यंबक वसेकर, संतबाबा बलिवदरसिंघजी, डॉ. शिवाजी िशदे, प्रा. दत्ता भगत, शेषेराव मोरे, संतबाबा नरेंद्रसिंघजी, अॅड. आर. एन. खांडील, राजेंद्र हुरणे यांना गौरविले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील रहिवाशांना गतवर्षीपासून ‘नंदिग्राम भूषण’ देऊन गौरविण्यात येते. गतवर्षी शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे पुरस्कार सोहळा झाला नाही. गतवर्षीचा पुरस्कार डॉ. मोरे यांना, तर यंदाचा कुळकर्णी यांना जाहीर झाला.
११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. झुंबरलाल कासलीवाल नगरी, तंत्रनिकेतन मदान येथे ८ व ९ फेब्रुवारीला होणाऱ्या राज महोत्सव कार्यक्रमात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती अॅड. दिलीप ठाकूर यांनी दिली.