ओझर येथे साकारणाऱ्या नाशिक विमानतळाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत वातानुकूलीत यंत्रणा आणि विद्युतीकरणाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. महिनाभरात विमानतळ पूर्ण होऊन ते उद्घाटनासाठी सज्ज होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नाशिकसारख्या ब वर्ग शहरांमध्ये असलेल्या विमानतळांपैकी अत्याधुनिक सुविधा असलेली ही एक इमारत आहे. या विमानतळाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणही हाती घेण्यात आले आहे. ओझर विमानतळ ३०० प्रवासी क्षमतेचे आहे. या विमान सेवेद्वारे नाशिक देशातील सर्व महत्वाच्या शहरांशी जोडले जाणार आहे. या ठिकाणी अबकारी कर, अग्निशमन यंत्रणा, प्रवेश व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, विश्रामकक्ष, हॉटेल्स यासह सर्व विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत आहेत.
ओझर येथील नाशिक विमानतळाकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ ते जानोरी या पाच किलोमीटरच्या रस्ता चौपदरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाच्या प्रगतीची माहिती दिली. शहरातून जानोरी अर्थात नाशिक विमानतळाकडे जाण्यासाठी म्हसरूळ-शिवनई आणि राष्ट्रीय महामार्गावरून जानोरीकडे या मार्गाने पोहोचता येते. या दोन्ही मार्गाची रुंदी वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरून जानोरीकडे जाणाऱ्या पाच किलोमीटच्या चौपदरीकरणासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी शेतकऱ्यांनी किमान चार मीटर जागा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
नाशिक विमानतळ महिनाभरात उद्घाटनास सज्ज
ओझर येथे साकारणाऱ्या नाशिक विमानतळाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत वातानुकूलीत यंत्रणा आणि विद्युतीकरणाचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.
First published on: 13-02-2014 at 12:30 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik airport ready to take off