सतरा उपाध्यक्ष, बारा सरचिटणीस, पंधरा चिटणीस, एकोणतीस निमंत्रित सदस्य, खजिनदार, प्रवक्ता आणि प्रसिद्धिप्रमुखही आहे, राष्ट्रवादीची जंबो शहर कार्यकारिणी जंबो असली तरी ती अपूर्ण आहे, हे विशेष. अजूनही काही पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत.
पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप यांनी शहर शाखेची कार्यकारिणी जाहीर केली. पत्रकार परिषदेत या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत त्यांनी या नावांची घोषणा केली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, आमदार अरुण जगताप, अशोक बाबर, डॉ. रावसाहेब अनभुले, किसनराव लोटके, डॉ. क्रांतिकला अनभुले आदी या वेळी उपस्थित होते.
निवडीनंतर तब्बल तीन महिन्यांनी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अजूनही वाढ करण्यात येणार असल्याचे जगताप यांनीच स्पष्ट केले. पहिल्या यादीत ७६ जणांचा समावेश आहे, मात्र त्यात सदस्य नाहीत. पदाधिकारी आणि निमंत्रित सदस्यांचाच त्यात समावेश आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरात पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे असे जगताप यांनी सांगितले. त्यादृष्टीनेच सर्वसमावेशक कार्यकारिणी करण्याचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.
आगामी काळात होणा-या निवडणुका लक्षात घेऊन ही कार्यकारिणी मोठी झाल्याचे कळमकर यांनी या वेळी मान्य केले, मात्र ते गरजेचे होते असेही ते म्हणाले. शहरात कोणी काहीही दावे करीत असले तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी व त्याआधीच्या काँग्रेसच्या महापौरांच्या काळातच मोठी विकासकामे झाल्याचा दावा कळमकर यांनी केला. पाण्याची फेज-२ योजना, नगरोत्थानमधील रस्ते या सर्व योजना त्या काळातच मंजूर झाल्या आहेत, त्यामुळेच पक्षाला आगामी काळात उज्ज्वल भवितव्य आहे असे ते म्हणाले.
अभिषेक कळमकर, सुमतिलाल कोठारी यांच्यासह १७ उपाध्यक्ष आहेत. प्रा. माणिकराव विधाते, विष्णुपंत म्हस्के, शरद क्यादर, दिलदारसिंग बीर आदींसह एकूण १२ सरचिटणीस आहेत. खजिनदारपदी अतुल भंडारी, प्रवक्तापदी अरविंद शिंदे आणि प्रसिद्धिप्रमुखपदी रमेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार कळमकर, आमदार जगताप, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले व पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकारी विशेष निमंत्रित आहेत. याशिवाय पक्षाचे सर्व नगरसेवकांचाही विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये समावेश आहे.        

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp executive committee is jumbo but incomplete