नवीन कल्याण परिसर
विकासाची धुळवड – २
* नव्या शहराचा भार जुन्या कल्याणवर
* नागरीकरणामुळे प्रश्नही वाढले
* शहाड पट्टयात दळणवळणाच्या सुविधेचा अभाव
आधारवाडी ते गंधारे, शहाड या पट्टय़ात विकसित होणाऱ्या नव्या कल्याणमुळे जुने, ऐतिहासिक कल्याणचे नागरीकरण मात्र काळवंडू लागले आहे. नव्या कल्याणचा विकास हा या भागातील शहरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा असला तरी यामुळे नवे कल्याण आणि जुने कल्याण असा एक प्रशासकीय, भौगोलिक विकासाचा वाद येत्या काळात निर्माण होईल, अशी भीती जाणकारांमधून व्यक्त होत आहे.
आधारवाडी ते शहाड, गंधारे पट्टय़ात गेल्या सात ते आठ वर्षांत  सुमारे १५ ते २० विकासकांचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले आहेत. ओसाड, दलदलीचा आणि दुर्लक्षित असलेल्या या भागाचे झपाटय़ाने शहरीकरण होऊ लागले आहे. घरांची वाढती गरज लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून विकासकांनी आपला मोर्चा शहाडकडे वळविला आहे. कल्याणमधील मूळ रहिवासी, काही स्थलांतरित कुटुंबांना स्थिरस्थावर होण्यासाठी एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून या नव्या कल्याणकडे पाहिले जात आहे.
मूळ कल्याण शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाखांच्या घरात आहे. नवे कल्याणही दोन ते तीन लाख लोकवस्तीच्या दिशेने प्रवास करीत आहे. या नव्याने विकसित होत असलेल्या कल्याण शहराला महापालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न होत असला तरी या नव्या नगरीच्या विकासाचा भार जुन्या, ऐतिहासिक कल्याणवर पडत आहे, असे चित्र आतापासूनच निर्माण झाले आहे. नव्या शहराच्या निर्मितीमुळे या पट्टयात वाहनांची संख्या दुप्पट झाली आहे. या वाहतुकीचा भार जुन्या कल्याणवर पडू लागला आहे. पाण्याची मागणी वाढल्याने जुन्या कल्याणचे पाणी या भागात वळविले जात आहे. महापालिकेने या भागात बससेवा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या वसाहतींमुळे नव्या कल्याणमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ओघही वाढला आहे. असे असले तरी नव्या शहराकडे लक्ष पुरविताना जुन्या कल्याणकडे दुर्लक्ष होते आहे का, याचा विचारही करण्याची वेळ आली आहे.
शिवाजी चौक, बाजारपेठ, पारनाका, दूधनाका, रामबाग भागातील जुने वाडे, जुन्या पडीक इमारती या कल्याण शहराची ऐतिहासिक ओळख आहे. नगरपालिका काळापासून येथील जुन्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. येथील बांधकामांचे जुने आराखडे, परवानग्या मूळ मालकांकडे उपलब्ध नाहीत. दस्तऐवज उपलब्ध
नसल्याने जुने वाडे, बंगले, इमारतींच्या पुर्नविकासाकरिता महापालिका परवानगी देत नाही. या भागात पुरेशा कागदपत्रांअभावी जमिन मालकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या नव्या जोडण्या मिळत नाहीत. त्यामुळे जुन्या सदनिकांची विक्री होत नाही. त्यामुळे जुने मूळ मालक, भाडेकरू अस्वस्थ आहेत. शासकीय स्तरावर याबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे बांधकाम व्यवसायिक व भाजपचे पदाधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले.
नवीन कल्याणच्या विकासात टीडीआर तसेच एफएसआयची खिरापत वाटताना लवचिक असलेले महापालिका प्रशासन जुन्या कल्याणमधील समस्यांचा फारसा विचार करताना दिसत नाही, असे चित्र आहे. जुन्या कल्याणमधील प्रश्नांचा गुंता वाढत गेल्यास त्याचा फटका संपूर्ण शहराच्या विकासावर होणार आहे.  नवीन कल्याणमध्ये एकीकडे मुबलक पाणी, सिमेंटचे रस्ते अशा सुविधा उपलब्ध होत असताना जुने कल्याण नागरी प्रश्नांमुळे काळवंडू लागले आहे. याची बोच येथील रहिवाशांना आहे.
आधारवाडी क्षेपणभूमीवरील दुर्गंधीमुळ मुळ कल्याणकर नाराज आहेत. नवीन कल्याणमध्ये राहाणाऱ्या रहिवाशांनाही या दुर्गंधीचा त्रास होताना दिसतो. नव्या शहरात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होत असला तरी दळणवळणाचा प्रश्न येथेही आवासून उभा आहे. नवीन भागात प्रवास करताना रिक्षा हे वाहतुकीचे एकमेव साधन सध्या असल्याने अनेक भागातील हजारो तयार सदनिका अद्याप रिक्त असून त्या नवीन रहिवाशाच्या प्रतीक्षेत असल्याचे या भागातील रहिवासी मोहन उगले, विद्याधर भोईर यांनी सांगितले. नवा-जुना वाद निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने येत्या काळात पुढाकार घेण्याची आवश्यकताही येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.