सायबर क्रांतीमुळे पुस्तकांसाठी दूरचित्रवाहिन्या आणि इंटरनेट हे पर्याय उपलब्ध असले तरीही पुस्तकांचे म्हणून जे काही फायदे असतात त्यावर हे पर्याय मात करू शकलेले नाहीत. त्यामुळे पुस्तकांना आजही पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी विलेपार्ले येथे व्यक्त केले. ‘मॅजेस्टिक बुक डेपो’ आणि ‘जवाहर बुक डेपो’ यांच्या संयुक्त विद्यमाने विलेपार्ले येथील जवाहर बुक डेपो येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सरवटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या वेळी चित्रकार सुहास बहुलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. स्नेहलता देशमुख व प्रतिभा देशपांडे लिखित ‘आई’ या पुस्काच्या पाचव्या आवृत्तीचे आणि ‘नाझीचा नरसंहार’ (कुमार नवाथे) या पुस्तकाच्या अरविंद दीक्षित यांनी केलेल्या अनुवादाचे प्रकाशनही सरवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कुमार नवाथे, राजेंद्र मंत्री, विनायक पणशीकर, दिलीप चावरे, पराग साठे आदी मान्यवर उपस्थित होते. मॅजेस्टिक बुक डेपोचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक तर जवाहर बुक डेपोचे दिलीप भोगले यांनी उपस्थितांचे आभार मानले. विलेपार्ले (पूर्व)रेल्वे स्थानकाजवळील जवाहर बुक डेपो येथे सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सुरू असून पुस्तक खरेदीवर १० ते ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No alternate to books vasant sarvate