मुंबईत येऊन प्रत्येकजण स्ट्रगल करतो तसेच मीसुद्धा करत होतो. नाही म्हणायला मालिकांमध्ये काही भूमिका करत होतो. त्याच वेळी महेंद्र तेरेदेसाई या दिग्दर्शकाने मला ‘राम बंधू मसाले’ यांच्या जाहिरातीच्या ऑडिशनला बोलावले. मला त्यावेळी ऑडिशन काय असते हेही माहीत नव्हतं. मला वाटलं कॅमेऱ्यासमोर उभं राहून एखादा उतारा बोलायचा असेल फक्त..पण, तिथे तसं काहीच झालं नाही. केवळ एक ओळ बोलायची
जाहिरात क्षेत्राने मुंबईत पाय घट्ट रोवून उभे राहण्यासाठी खूप मदत केली. ‘आयसीआयसीआय’च्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन यांना जवळून पाहता आले. त्यावेळी एक अनुभव मला आला की, ही मोठी माणसं या ठिकाणी का असतात? यत्किंचितही अहंकार त्यांच्या देहबोलीत नसतो. यायचं आणि काम करायचं हेच यांचं सूत्र ठरलेलं असतं. ‘आयसीआयसीआय’च्या जाहिरातीनंतर माझा भाव नक् कीच वधारला होता यात शंका नाही. त्यानंतर ‘आयडिया’च्या जाहिरातीत अभिषेक बच्चनसोबत काम केलं.. असा माझा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. अनेक नामांकित ‘ब्रॅण्ड’सोबत काम करताना तुम्हालाही खूप शिकायला मिळतं.
अमरावतीमध्ये असताना रवींद्र नाटय़मंदिरला येण्याची संधी वर्षांतून एकदा कधीतरी मिळायची. आमचा प्रयोग झाल्यावर अमरावतीला जायची आवराआवर सुरू व्हायची. या दरम्यान किमान दीड ते दोन तास रवींद्रच्या गेटवर उभा राहायचो. तिथून जाणाऱ्या मोठय़ा गाडय़ा पाहिल्यावर आपलीही अशी गाडी असावी, असं मनोमन वाटायचं. स्वत:ची गाडी घेतल्यावर रवींद्रच्या रस्त्यावरनं जाताना जुन्या गोष्टी आठवल्या आणि डोळ्यांत अक्षरश: पाणी आलं. हा अनुभव आणि इथवर पोहोचण्याची संधी मला या क्षेत्राने दिली आहे. तुमच्यात मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला या क्षेत्रात मरण नाही. आलेलं काम प्रामाणिकपणे करा. इथे या क्षेत्रात कुठलाही वशिला चालत नाही हे लक्षात घेऊनच प्रवेश करा.
माझी भाषा गावंढळ आहे, मला इंग्रजी चांगलं येत नाही. आता माझं कसं होणार, हा प्रश्न मला कधीही पडला नाही वा त्यामुळे मला कुठलीही अडचण आली नाही. मी कुठल्याही ऑडिशनला जाताना दोनशे टक्के आत्मविश्वास गाठीला बांधून जायचो. जे होईल ते होईल हाच विचार करून मी काम करत गेलो. आजच्या घडीला वऱ्हाडी भाषा आणि माझ्या आवाजाचा हेल याला अनुसरून मला कामं मिळत आहेत. त्यामुळे केवळ एकच लक्ष्य नजरेसमोर ठेवा ते म्हणजे स्वत:ला सिद्ध करा.
भारतचा सल्ला
जाहिरात क्षेत्रात काम मिळवण्यासाठी केवळ स्वत:ला सिद्ध करावं लागतं. इथे कुठलाही वशिला चालत नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही दिसायला सुंदर असलात तरी उत्पादनाची गरज लक्षात घेऊनच तुमची निवड होते. त्यामुळे कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही हे मनाशी पक्कं करा.
भारतच्या गाजलेल्या जाहिराती
आयसीआयसीआय बँक, आयडिया, गुडरिक चहा, एक्सो राऊंड डिशवॉश, हेवल्स वायर, राम बंधू मसाले, भारत निर्माण.