विवाहविषयक संकेतस्थळावर तरुणींशी ओळख करून नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणास बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दहा तरुणींना फसविल्याची कबुली दिली आहे.
फिर्यादी महिला घटस्फोटित असून तिने विवाहासाठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले नाव नोंदविले होते. आंध्र प्रदेशातील रहिवाशी असलेली ही महिला एका बँकेत काम करते. काही दिवसांपूर्वी तिला फिरोज खान नावाच्या तरुणाने संपर्क केला. आपल्याबद्दल त्याने खोटी माहिती या फिर्यादी महिलेला दिली आणि लग्नाची मागणी केली. त्यानंतर काही दिवस ते संपर्कात होते. त्याच्याबद्दल विश्वास वाटल्याने फिर्यादीने आपल्या घरी माहिती दिली. मागील आठवडय़ात त्याला भेटण्यासाठी ती मुंबईला आली.
मुंबईत ते एका लॉजमध्ये उतरले होते. दोन दिवसांत फिर्यादी महिलेने लग्नाची खरेदी केली. त्यात सोन्याचे दागिने आणि कपडय़ांचा समावेश होता. मात्र तिची नजर चुकवून आरोपी खान तिची बॅग घेऊन पळून गेला. त्याने आपला फोन बंद केला. त्याच्याबद्दलची सर्व माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी फिरोज खान विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी अशाच एका प्रकरणात फिरोज खानला अटक केली होती. त्याला बांगूर नगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
फिरोज हा विवाह जुळविणाऱ्या विविध संकेतस्थळांवर लग्नासाठी अर्ज करीत नाव नोंदवायचा. घटस्फोटित तसेच काम करणाऱ्या महिलांना तो खोटी माहिती देऊन आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यांना लग्नाचा प्रस्ताव देऊन भेटायला बोलवायचा. त्यांनतर त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान ऐवज घेऊन पळ काढायचा. त्याच्या विरोधात एमआरए मार्ग, बांगूरनगर, खोपोली, खारघर, नवी मुंबई आदी पोलीस ठाण्यात अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आतापर्यंत दहा महिलांना फसविल्याची कबुली दिली आहे. त्याला १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2015 रोजी प्रकाशित
विवाह संकेतस्थळांवरून तरुणींची फसवणूक करणारा भामटा गजाआड
विवाहविषयक संकेतस्थळावर तरुणींशी ओळख करून नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणास बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दहा तरुणींना फसविल्याची कबुली दिली आहे.
First published on: 15-04-2015 at 06:31 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online marriage frauds