अक्कलपाडा धरणातील आरक्षित मृत जलसाठा पांझरा काठावरील गावांसाठी चोवीस तासांच्या आत सोडण्यात यावा, असा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आ. शरद पाटील यशस्वी ठरले आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री व विभागीय आयुक्त यांची मुंबई येथे भेट घेत टंचाईची परिस्थिती व पाणी    सोडण्यात    होत   असलेले राजकारण    लक्षात   आणून दिल्यानंतर सदर आदेश देण्यात आले आहेत.
बहुचर्चित अक्कलपाडा धरणात पांझरेत वाहून जाणारे पाणी दोन वर्षांपासून अडविण्यात येत असून, हा जलसाठा दुष्काळी परिस्थितीसाठी उपयुक्त ठरत आहे. १८ मार्च २०१३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन सदर पाण्याचे आवर्तन सोडण्याचे लेखी आदेश व नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला  दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे १२ एप्रिल २०१३ रोजी आ. पाटील यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकाऱ्यांना चार तास घेराव घालून पाणी सोडण्याचे लेखी आदेश घेतले. त्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून पाणी सोडण्यास टाळाटाळ करण्यात आली. पाणी प्रश्न अधिक गंभीर होत असल्याने जनतेच्या मनात जिल्हाधिकारी व प्रशासनाबद्दल रोष वाढत गेल्याने शरद पाटील व साहेबराव पाटील या दोघा आमदारांनी सोमवारी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची भेट घेऊन विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून    चोवीस   तासांत पांझरेच्या पात्रात पाणी सोडण्याचे आदेश मिळविण्यात यशस्वी झाल्याने पाणी सोडण्याचा शेवटचा अडथळा दूर झाला आहे.