गेली अनेक वर्षे गृहनिर्माण सोसायटय़ांकडून करण्यात आलेल्या मागणीचा विचार करून पावसाळ्यापूर्वी खासगी मालमत्तांवरील वृक्षांची छाटणी करण्यास  तसेच कीटकनाशकाची फवारणी करून महापालिका राजी झाली आहे. मात्र त्यासाठी गृहनिर्माण सोसायटय़ांना पैसे मोजावे लागणार आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यालगतच्या वृक्षांची छाटणी करण्यात येते. यंदाही पालिकेने त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. या कामासाठी पालिकेला २५ कोटी मोजावे लागले. मात्र यंदा अनेक ठिकाणी वृक्ष छाटणीचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे सोसाटय़ाच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून अपघात झाले. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांचेही नुकसान झाले. मुंबई हिरवीगार व्हावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन पालिकेकडून मुंबईकरांना करण्यात येते. तसेच स्वस्त दरात चार फूट उंचीची झाडेही उपलब्ध करून दिली जातात. मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायटय़ा ही झाडे आपल्या आवारात लावतात. मात्र ही झाडे मोठी झाल्यावर रहिवाशांना त्यांचा त्रास होऊ लागतो. वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी महापालिका खासगी मालमत्तेवरील वृक्षांची छाटणी करीत नाही. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटय़ांनाच पैसे मोजून वृक्ष छाटणी करून घ्यावी लागते. हे काम करणारी माणसे मिळत नसल्यामुळे अनेक वेळा गृहनिर्माण सोसायटय़ांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे खासगी मालमत्तेवरील वृक्ष छाटणी पालिकेनेच करावी अशी मागणी गृहनिर्माण सोसायटय़ांकडून करण्यात येत होती.
मुंबईकरांकडून वसूल करण्यात येणाऱ्या मालमत्ता करामध्ये ०.०५ टक्के वृक्ष कराचा समावेश करण्यात आला आहे. एखाद्या सोसायटीत झाड नसले तरीही हा कर त्याला भरावाच लागतो. नागरिक जर वृक्ष कर भरत असतील तर वृक्षछाटणीची जबाबदारीही पालिकेनेच घ्यायला हवी या मागणीने जोर धरला होता. अखेर आता पालिका खासगी मालमत्तेवरील वृक्ष छाटणी करण्यास राजी झाली आहे. मात्र मालकाला विभाग कार्यालयामध्ये त्यासाठी अर्ज शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर नाममात्र शुल्क आकारून कीटकनाशकांची फवारणीही करून देण्यात येईल, असे उपायुक्त एस. एस. शिंदे यांनी सांगितले.
अशी होईल शुल्क निश्चिती
मालकाने अर्ज केल्यानंतर पालिकेचा कंत्राटदार संबंधित वृक्षांची पाहणी करून छाटणीच्या खर्चाचा प्रस्ताव पालिकेला देईल. छाटणी करण्यात येणाऱ्या वृक्षाची उंची, घेर, फांद्या, आसपासची परिस्थिती आदींचा विचार करून हा खर्च ठरविण्यात येईल. वृक्ष छाटणी केल्यानंतर हा खर्च मालकाकडून वसूल करण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay for tree pruning bmc