राज्यातील पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती अखिल भारती इथेनॉल उत्पादक व पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. राज्यात दहा टक्के तर उर्वरित देशासाठी पूर्वीप्रमाणे पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉलचा वापर केला जाणार आहे. या परवानगीनुसार इथेनॉलचा पुरवठा एका वर्षांसाठी येत्या १ मार्चपासून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या आईल कंपनीच्या वेबसाईटवर इच्छुक इथेनॉल उत्पादक व पुरवठादारांकडून इथेनॉल पुरवठा करण्याबाबत ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. यात पाच टक्क्य़ांप्रमाणे संपूर्ण देशासाठी १४०.४१ कोटी लिटर्स तर महाराष्ट्र राज्यासाठी दहा टक्क्य़ांप्रमाणे ३१.५२ कोटी लिटर्स इथेनॉलची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात व देशात पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळून २० राज्ये व ४ केंद्रशासित राज्यांमध्ये वापर केला जात होता.
राज्यातील मद्यार्क, मळी तसेच आंतरराष्ट्रीय क्रूड ऑईल तेलाच्या दरात झालेली वाढ विचारात घेता इथेनॉल उत्पादकांना प्रतिलिटर ३७ रुपये एवढा दर मिळावा तसेच पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉलच्या वापरासाठी परवानगी मिळावी म्हणून अखिल भारतीय इथेनॉल उत्पादक व पुरवठादार संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पाठपुरावा केला होता. ३७ रुपये दरानुसार खरेदी प्रलंबित असली तरी शासनाने पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी दिली आहे.
इथेनॉल उत्पादक व पुरवठादार संघटनेच्या सभासदांनी आतापर्यंत ५८.१० कोटी लिटर्स इथेनॉलचा पुरवठा केला आहे. मागील २०१२ वर्षांत निविदांसाठी राज्यातील ३५ इथेनॉल उत्पादकांनी पुरवठा करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार प्रतिलिटर ३७ रुपयांप्रमाणे किंवा केंद्रीय कॅबिनेट मंत्री गटाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे इथेनॉलचा पुरवठा करण्याची तयारी दर्शविताना सोबत आवश्यक ईओआयची प्रक्रियाही पूर्ण केली होती. परंतु ऑईल कंपन्यांनी इथेनॉलच्या दरात वाढ न करता सध्याच्या २७ रुपयांप्रमाणे पुरवठा करण्यास कळविले होते. या जुन्या दराप्रमाणे इथेनॉल उत्पादकांना प्रचंड तोटा सहन करावा लागत होता. सध्या इथेनॉलचा उत्पादन खर्च ३५ ते ३६ रुपये असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मंत्री गटाने इथेनॉलच्या खरेदीबाबत इथेनॉल उत्पादक व ऑईल कंपन्यांनी एकत्र बसून दर ठरवावेत तसेच देशातील सर्व उत्पादक पुरवठादारांकडून इथेनॉल खरेदी करण्यात यावे, असा निर्वाळा दिला होता. परंतु त्यानंतरही ऑईल कंपन्यांनी आपला हेका सोडला नसल्याबद्दल मोहिते-पाटील यांनी खंत व्यक्त केली.