राज्यातील १९ अनुदानित फार्मसी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून वेळेवर मासिक वेतन मिळत नाही. आता ४ महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येत आहे. याला कंटाळलेल्या येथील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी वार्षिक परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
चालू आर्थिक वर्षांत संस्थांना प्राप्त अनुदानातून मागील वर्षांतील काही प्रलंबित मासिक वेतन व सप्टेंबर २०१२ पर्यंतचे वेतन कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आले. ऑक्टोबरपासूनचे वेतन प्रलंबित आहे. या अनुदानासाठी चन्नबसवेश्वर संस्थेने वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. परंतु अनुदान केव्हा मिळेल याची माहिती मिळाली नाही. चार महिन्यांचे वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन उदरनिर्वाह, कामाचा ताण, बँकेच्या कर्जाचे हप्ते, पाल्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यास पैसे नसल्याने या कर्मचाऱ्यांची प्रचंड ओढाताण होत आहे. संस्थेने वेतनासंदर्भात वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला. मात्र, वरिष्ठ दखल घेत नाहीत. या संस्थेतील २३ कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना पूर्वसूचना देऊन वार्षिक परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. बी. व्ही. नल्ले, ए. एफ. फडतरे, आर. एम. राजूरकर, पी. एच. भोसले, बी. के. सुगावे, आर. व्ही. सुगावे, आर. वाय. बिडवे आदींच्या या निवेदनावर सह्य़ा आहेत.