दख्खनचा राजा ज्योतिबा तीर्थक्षेत्रासाठी १५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दिली. महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री ज्योतिबा डोंगराचा तीर्थक्षेत्र आराखडा तयार करण्याचे काम शासकीयस्तरावर सुरू होते. त्याची माहिती ज्योतिबा डोंगर येथे आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत आमदार विनय कोरे यांनी तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे, सुशोभीकरण आदी कामे प्राध्यान्याने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. दर्शन मंडप, पर्यटन, आरोग्य स्वच्छता, रस्ते आदी विविध घटकांवर चर्चा करण्यात आली.     
सरपंच शिवाजी सांगळे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी केली. बैठकीस निवासी जिल्हाधिकारी संजय पवार, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार प्रशांत पिसाळ, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती संजय चावरेकर, विष्णुपंत दादरणे, अशोक रोकडे, दीपक म्हेतर, उदय गायकवाड, सन्मनी मिरजे, एस.एस.धोदे आदी उपस्थित होते.