घरकाम येत नाही व इतर क्षुल्लक कारणांवरून सासरी होणाऱ्या छळाला वैतागून एका नवविवाहितेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासू या दोघांविरूध्द सदर  बझार पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
कुर्बानहुसेन झोपडपट्टीत घडलेल्या या गुन्ह्य़ाची माहिती अशी की, गुलकशा महिबूब शेख (वय १९) हिचा विवाह महिबूब शेख याजबरोबर झाला होता. परंतु सासरी नांदत असताना घरकाम करता येत नाही म्हणून सासू नूरजहाँ ही तिचा छळ करत असे. तिच्या चिथावणीवरून पती महिबूब हा तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने अखेर जीवनास वैतागून गुलक्शा हिने घरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अखेर तिचा मृत्यू झाला. तिची आई हसीना शेख हिच्या फिर्यादीवरून मृत गुलकशा हिच्या पती व सासू या दोघाना अटक करण्यात आली.