वर्तवणूक व चरित्र पडताळणीचा बनावट दाखला तयार केल्याप्रकरणी पोलिसांच्या संगणक कार्यालयातील कर्मचाऱ्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय शुल्काच्या नावाखाली संबंधित पोलीस नाईकाने ३०० रुपये शासकीय शुल्क घेऊन बनावट दाखला तयार करून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक पाडवी यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून संगणकीय कार्यालयातील पोलीस नाईक विजय शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण पाटील यांचा हा दाखला आहे. त्यांच्याकडून शेळके यांनी छायाचित्र व कागदपत्रे घेऊन वर्तवणूक व चारित्र्याचा बनावट दाखला तयार केला. तो खरा आहे हे भासविण्यासाठी पाटीलकडून ३०० रुपये सरकारी शुल्क म्हणून घेण्यात आले. त्यानंतर नरेश म्हस्के याच्या हस्ते तो भूषण पाटीलला देऊन बनावट दस्तावेज तयार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी संशयितास अद्याप अटक झालेली नाही.