महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या येथील हिरे घराण्याचे एक वारसदार माजी मंत्री प्रशांत हिरे यांना विधानसभेच्या सलग दोन निवडणुकांमध्ये धूळ चारणारे शिवसेनेचे दादा भुसे आणि हिरे कुटूंबिय यांच्यात गेल्या दहा वर्षांत राजकीय शत्रूत्व निर्माण झाले असताना लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय आणि आ. भुसे हे एकाच व्यासपीठावर आल्याचे दुर्मीळ चित्र मालेगावकरांना पाहावयास मिळाले. धुळे मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्ताने हे दोघे नेते एकत्र आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
जनराज्य पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या अद्वय हिरे यांची धुळे मतदार संघातून निवडणूक लढविण्याची मनिषा होती. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र भाजपने डॉ. भामरे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या हिरे यांनी या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत या हेतूने डॉ. भामरे यांना आपण पाठिंबा जाहीर करत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. जनराज्य आघाडीची ताकद आणि महायुती एकत्र आल्यास मालेगाव बाह्य मतदारसंघात डॉ. भामरे यांना घसघशीत आघाडी मिळू शकेल असा कयास राजकीय धुरिणांमध्ये बांधला जात असला तरी सेनेचे आमदार भुसे आणि हिरे कुटूंबिय यांच्यातील राजकीय वैर बघता हे दोघे कशाप्रकारे प्रचाराची रणनीती अवलंबतात आणि ते एकत्र प्रचार करतील काय यासारखे प्रश्न निर्माण झाले होते. परंतु किमान लोकसभा निवडणुकीपुरते का होईना दोघांनी एकत्रितरित्या सक्रिय राहण्याचा निर्णय घेतल्याने डॉ. भामरे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
डॉ.भामरे व भुसे यांनी मंगळवारी दिवसभर तालुक्यात प्रचार दौरा केला. शहरातील सटाणा नाका भागात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भुसे व हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हावे अशी इच्छा डॉ. भामरे यांनी व्यक्त केली. त्यास दोघांनी होकार दिल्यावर उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यावेळी समोरासमोर आल्यावर दोघांनी स्मितहास्य करत नमस्कार केला.
अशा रितीने उभयपक्षी असलेले राजकीय हाडवैर विसरून भुसे-हिरे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुनील चौधरी, नंदू सोयगावकर, भरत पोफळे, लकी गील, दादा जाधव आदी उपस्थित होते.