मेगाब्लॉकमध्ये रुळ खाली घेणार
मध्य रेल्वेवर डीसी-एसी या प्रवाहांच्या परिवर्तनात सध्या पारसिकच्या बोगद्याचा अडसर येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. डीसी-एसी परिवर्तनासाठी ओव्हरहेड वायर आणि वरील पृष्ठभाग यांच्यात एक किमान अंतर असणे आवश्यक असते. मात्र बोगद्याचे छत आणि ओव्हरहेड वायर यांच्यातील हे अंतर खूपच कमी आहे. त्यामुळे हे अंतर वाढवण्यासाठी रेल्वेरूळ खाली घ्यावे लागणार आहेत. ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने पारसिक बोगदा डीसी-एसी परिवर्तनात अडसर ठरत आहे.पश्चिम रेल्वेमार्गावर डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतर मध्य मार्गावरही विद्युत प्रवाहाचे परिवर्तन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत उपनगरीय मार्गावरील कल्याण ते मुलुंड या स्थानकांदरम्यानच्या चार मार्गिका आणि बाहेरगावच्या गाडय़ांच्या मार्गावरील कल्याण ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यानच्या पाच व सहा या मार्गिका यांमध्ये डीसी-एसी परिवर्तनाचे काम सुरू करण्यात आले आहे. कल्याण ते मुंब्रा दरम्यानचे काम पूर्ण झाले असून मुंब्रा व ठाणा यांदरम्यान असलेल्या पारसिक बोगद्याच्या उंचीमुळे काम रखडले आहे.या बोगद्यात ओव्हरहेड वायर व बोगद्याचे छत यांच्यातील अंतर आधीच कमी आहे. डीसी विद्युत प्रवाहांना हे अंतर कमी असलेले चालते. मात्र एसी प्रवाहासाठी हे अंतर ४.६९ फूट असावे लागते. सध्या बोगद्यात एवढे अंतर नसल्याने मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागासमोर पेच पडला होता. मात्र आता दोन मेगाब्लॉकदरम्यान बोगद्यातील रेल्वे रूळ खाली उतरवून रूळ आणि बोगद्याचे टप यांतील अंतर वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. हे काम झाल्यानंतरच पुढील काम मार्गी लागणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.