‘स्वराली’ संस्थेने आषाढ माहिन्याचे औचित्य साधून विठ्ठलभक्तीचा महिमा सांगणाऱ्या अभंगगीतांचा ‘अवघे गरजे पंढरपूर’ हा सुंदर आणि श्रवणीय कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. विदर्भात महिलांचा वाद्यवृंद असलेली ही एकमेव संस्था असून हा कार्यक्रम सरकत्या मंचावर सादर करून आपल्या कल्पकतेची चुणूक दाखविली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अनुराधा मुंडले उपस्थित होत्या. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मेघमल्हार रागाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पावसाळी वातावरण आणि त्यात मेघमल्हारच्या तराण्यांनी ‘स्वराली’च्या सुपरिचित वाद्यवृंदाच्या तबल्यावर मेघाचे बोल आणि सतारीवरील मेघमल्हार हा सोहळा रसिकांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरला. त्यानंतर ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘खेळ मांडियेला’ हे अभंग वाद्यवृंदांच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले.
रूपाली मुजूमदार यांनी ‘सुंदर ते ध्यान’, मधुलिका पारखी यांनी ‘रंगा येई वो’, ‘आनंदाचे डोही’, रसिका करमळेकर, ‘विठ्ठल सावळा’, ‘आगा वैकुंठीचा राया’, मोहिनी बरडे ‘पांडुरंग कांती’, ‘मोगरा फुलला’, ‘भेटी लागे जिवा’, अश्विनी कोरान्न्ो ‘बोलावा विठ्ठल’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, वैशाली पाटील ‘विठूचा गजर हरीनामाचा’, विद्या नामजोशी ‘देवाचाही देव करितो’ या सर्वानी असे एकापेक्षा एक अभंग सादर करून रसिकांकडून वाहवा मिळविली. विशेषत: प्रत्येक अभंगानंतर वाद्यवृंदावर ‘घनु वाजे रुणझुणा’, ‘पैल तोगे काऊ कोकताहे’, ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’, ‘आजि सोनियाचा दिनू’, ‘अरे अरे ज्ञाना झाला’ हे अभंग अतिशय तयारीने मृदुभाव आणून वाद्यांवर सादर केले. याला रसिकजनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अभंगगीतांत रसिका करमळेकर, मोहिनी बरडे आणि अश्विनी कोरान्न्ो यांनी रसिकांची प्रशंसा मिळविली. मधुलिका पारखी आणि वैशाली पाटील यांनी सुद्धा मेहनत घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची संकल्पना नंदिनी सहस्त्रबुद्धे यांची होती. विद्याधर सहस्त्रबुद्धे आणि माधव घोडवैद्य यांच्या सहकार्याने ती प्रत्यक्षात उतरली. नीता परांजपे यांनी निवेदनाची बाजू उत्तम रीतीने सांभाळली. कार्यक्रमातील वाद्यवृंदांनी उत्तम साथसंगत केली.