आपण ठरवतो पण प्रत्यक्षात काहीच करत नाही. तसेच आपल्याकडे जोपर्यंत दंड भरावा लागत नाही, तोपर्यंत सुधारणाच होत नाही, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ठाण्यात व्यक्त केले. तसेच यंदाच्या वर्षांत आपल्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करू या, असा संकल्पही त्यांनी यावेळी केला.
ठाणे वाहतूक शाखा आयोजित रस्ता सुरक्षा अभियान-२०१३ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सिने अभिनेता मंगेश कदम, अभिनेत्री निर्मिती सावंत, पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी, सहपोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी आणि प्रवीण पवार उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त रघुवंशी यांच्या हस्ते व्यायामशाळा, वाचनालय तसेच सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते महिला कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस दलात माझ्या ओळखीचे आहेत म्हणून वाहतूक नियम तोडणे ही चुकीचे असून ही मानसिकता आता बदलायला हवी, असे अभिनेता मंगेश कदम यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने प्रवास करताना वाहतूक नियमांचे बंधन स्वत: वर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण स्वत:च्या व इतरांच्या जिवाचे रक्षण करू शकतो. आपण जर वाहतूक नियम पाळले तर वाहतूक पोलिसांनाही कमी त्रास होईल, असेही त्यांनी सांगितले. वाहन ही आता सर्वाची गरज असली तरी स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूकीचे नियम पाळले पाहिजेत. तसेच वाहतूक नियम सर्वाना सारखाच असला पाहिजे, असे मत सिने अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा सप्ताह फक्त १५ दिवसांचा नसून तो ३६५ दिवस पाळला पाहिजे. तसेच वाहतूक व्यवस्था ठेवणे हे जरी पोलिसांचे काम असले तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करायला हवे, असे आयुक्त रघुवंशी यांनी सांगितले. सिने कलाकारांची टीव्हीवरील अभिनय पाहून त्याप्रमाणे काही जण वागतात. त्यामुळे या सिने कलाकारांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी पण ऐकायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.
‘झेंब्रा क्रॉसिंगचे पालन करा..पादचाऱ्यांचा सन्मान करा’, असे यंदाच्या वर्षीचे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे मुख्य उद्दिष्टे असून त्यासाठी फुगा, फ्लोट व मॅसकॉट झेब्रा याचे अनावरण करण्यात आले, तसेच मॅसकॉट झेब्राला ‘झेबु’ असे नाव देण्यात आले आहे.