अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. मारेकऱ्यांचा त्वरित शोध लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विनय फाऊंडेशन
शहरातील विनय फाऊंडेशनच्या वतीने मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंनिसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणी व विज्ञानवादी दृष्टिकोन पोहचविण्यात डॉ. दाभोलकरांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. जादूटोणाविरोधी कायद्यासाठी त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा व जनजागृती केली. त्यांचे हे कार्य महाराष्ट्र विसरू शकत नाही. अशा विचारवंत कार्यकर्त्यांची हत्या होणे ही पुरोगामी राज्याच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब असल्याचेही फाऊंडेशनने म्हटले आहे.
भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ
भारताचे लोकशाहीवादी युवा महासंघाच्या नाशिक समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन जादूटोणाविरोधी विधेयक त्वरित मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विवेकवादी, विज्ञानवादी आणि पुरोगामी दिशा देणारे विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव अग्रणी आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेटाने चालवलेली अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमुळे समाजामध्ये आमूलाग्र बदल झाले. अशा वैचारिक कार्यकर्त्यांची पुण्यामध्ये हत्या होणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शासनाने त्वरित संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मारेकऱ्यांना लवकर अटक न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भारतभूषण फाऊंडेशन
सातपूर येथील भारतभूषण फाऊंडेशनने दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करीत ही हत्या म्हणजे महाराष्ट्राची उत्तर प्रदेशकडे होणारी वाटचाल असल्याचे म्हटले आहे. पुरोगामी विचारसरणी संपविण्याची ही कल्पना असून हल्लेखोरांना राज्य शासनाने त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केली आहे.
लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान
पिंपळगाव बसवंत येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आणि बोधी स्वयंम साहाय्यता युवा बचत गट यांच्या वतीने पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. भारतीय संविधान व लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि विज्ञानाभिमुख समाजनिर्मितीसाठी गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनाचा विचार डॉ. दाभोलकर यांनी दिला. यासाठी अंनिस, साधना व राष्ट्र सेवादल यांचा माध्यम म्हणून उपयोग केला. त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध प्रतिष्ठानने केला आहे.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest for assassination of dr narendra dabholkar from all levels