राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. पी. परचंड यांना काळे फासल्याच्या निषेधार्थ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे रुग्णालयातील कामकाज आज अर्धा दिवस बंद राहिले.
अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारनंतर रुग्णसेवा सुरू झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांना आधार मिळाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानी आरपीआयचे सखाराम कामत यांना अटक केली. त्यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. नियमांचे उल्लंघन व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करीत डॉ. परचंड यांना काळे फासण्याचा प्रयत्न काल झाला होता. या प्रकारामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यांची तातडीची बैठक होऊन या प्रकाराच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. हीच परिस्थिती मंगळवारीही कायम राहिली. आजही कर्मचाऱ्यांचे कामकाज बंद राहिले. आंदोलनाचा फटका रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना बसला. इस्पितळातील रुग्णसेवा कोलमडली होती.
स्वाभिमानी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी इस्पितळात गोंधळ घातल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी मंगळवारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मध्यवर्ती संघटना यांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.
अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज, निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये उपजिल्हाधिकारी सुनंदा गायकवाड, विशेष भूसंपादन अधिकारी सुरेश जाधव, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयंत वाटवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एल. पाटील, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आसमत हवेरी, सचिव संजय क्षीरसागर, कार्याध्यक्ष बंटी सावंत, चिटणीस अनिल लवेकर, डॉ. प्रवीण कल्याणकर, डॉ. जया रोटे आदींनी भाग घेतला.
शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात कृती समिती स्थापन करण्यात आली असून कर्मचारी संघटित झाले आहेत, असा उल्लेख करून लवेकर यांनी अशाप्रकारचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. डॉ. परचंड यांना काळे फासणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ररुग्णालयामध्ये कोणत्याही कारणावरून ऊठसूट आंदोलन करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या प्रकारांना पायबंद घालून रुग्णसेवा करणाऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. धुळाज व पवार यांनी इस्पितळामध्ये काल गोंधळ घालणाऱ्यांवर तत्वर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून सामूहिक प्रयत्नातून अशा प्रयत्नांना विरोध करावा. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हय़ात राबविल्या जाणाऱ्या योजनांचे कौतुक केले आहे. त्या अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या आश्वासनानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कामकाज पूर्ववत सुरू झाले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2013 रोजी प्रकाशित
काळे फासल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचा मोर्चा
राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम. पी. परचंड यांना काळे फासल्याच्या निषेधार्थ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे रुग्णालयातील कामकाज आज अर्धा दिवस बंद राहिले.

First published on: 10-04-2013 at 01:27 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest march of workers of pramilaraje hospital