काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्का यांच्यावर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने रिव्हॉल्व्हर रोखण्याबाबतची तक्रार शनिवारी कदीम जालना पोलीस ठाण्यात देण्यात आली. परंतु या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरी सुविधा पुरविण्यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे उदासीन असल्याची तक्रार शुक्रवारी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी शनिवारी पालिका कार्यालयात येणार होते. त्यामुळे ढक्का व काही नगरसेवक सकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात आले होते. त्यानंतर ढक्का यांनी पोलीस ठाणे गाठून मुख्याधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाने आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याची तक्रार केली.
दरम्यान, स्थानिक आमदार कैलास गोरंटय़ाल हेही पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणी पोलीस अधिकारी, तसेच नगरसेवकांशी चर्चा केली. या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस उपअधीक्षक रोहिदास जाधव यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raised pistol on corporator by guard of ceo