अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर हे दोघे एकमेकांचे मित्र. ‘वेक अप सिड’ या चित्रपटामुळे अयान आणि रणबीरची जोडी जमली. ती आता पुन्हा एकदा ‘ये जवानी है दिवानी’च्या निमित्ताने एकत्र रंग दाखविणार आहे. अयान जसा रणबीरचा मित्र तसाच दीपिकाचाही! या चित्रपटाच्या निमित्ताने अयान आणि रणबीर जसे एकत्र येतायत, तसेच रणबीर आणि दीपिकाही. कारकिर्दीच्या एका टप्प्यावर पुन्हा पडद्यावर एकत्र येत आहेत. ‘स्क्रीन प्रिव्ह्य़ू’साठी आलेल्या रणबीर-दीपिकाने या चित्रपटाविषयी आणि एकमेकांविषयी वाटणाऱ्या आपल्या विचारांना मोकळी वाट करून दिली.
‘बचना ए हसीनों’ या चित्रपटात रणबीर आणि दीपिका पहिल्यांदा एकत्र आले. दोघांचेही बॉलीवूडचे सुरुवातीचे दिवस होते. या चित्रपटानंतर दोघांनीही आपापली वाट पकडली. पण दरम्यानच्या काळात एकमेकांबरोबर अफेअर, प्रेमभंगाचे दु:ख, नवा जोडीदार शोधणं अशा कितीतरी गोष्टी घडून गेल्या. त्यामुळे ‘ये जवानी है दिवानी’च्या निमित्ताने पुन्हा एकत्र काम करीत असलेल्या रणबीर आणि दीपिकामध्ये जुने प्रेम नव्याने उमलू लागले आहे की काय अशा चर्चा माध्यमांनी सुरू केल्या. रणबीरने मात्र या चित्रपटाच्या वेळी दीपिकाबरोबर काम करतानाचा अनुभव सर्वस्वी वेगळा असल्याची कबुली दिली. ‘बचना ए हसीनों’च्या वेळी दीपिकाही बॉलीवूडमध्ये नवीन होती. त्यानंतर ‘ओम शांती ओम’मध्ये दीपिकाने जो अभिनय केला तो वाखाणण्याजोगा होता. त्यानंतर तिने विविध दिग्दर्शकांबरोबर विविध विषयांवरती चित्रपट केले. अभिनेत्री म्हणून दीपिकाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. आताच्या क्षणाला दीपिका बॉलीवूडमधली एक सर्वोत्तम अभिनेत्री आहे यात शंकाच नाही, अशा शब्दांत रणबीरने दीपिकाचे कौतुक केले. दीपिका एक कष्टाळू, पॅशनेट, कामाप्रती निष्ठा असलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे ‘ये जवानी है दिवानी’साठी दीपिकाबरोबर काम करताना खूप मजा आली, असे रणबीरने सांगितले. एकीकडे रणबीरने केलेल्या कौतुकामुळे थोडीशी संकोचलेली दीपिका दिग्दर्शक म्हणून अयान आणि तिच्या व्यक्तिरेखेविषयी खुलून बोलली. अयान हा माझा आवडता दिग्दर्शक आहे. त्याचा ‘वेक अप सिड’ हा चित्रपट पाहिल्यापासून त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी मी हुडकत होते. ‘ये जवानी है दिवानी’च्या निमित्ताने माझ्यासाठी हा योग जुळून आला. मला वाटतं, रणबीर आणि मी पडद्यावर एकत्र येण्यासाठी ‘ये जवानी है दिवानी’ हा एकदम योग्य चित्रपट आहे, असे दीपिकाने या वेळी सांगितले. नैना नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा दीपिकाने या चित्रपटात साकारली आहे. नैना आपले आयुष्य फार विचारपूर्वक व्यतीत करते. ती कधी खूप उत्साहात येत नाही, ती कधीही आयुष्यात नवं काही शोधायचा प्रयत्नही करीत नाही, ती आपल्या माणसांची, आई-वडिलांची सतत काळजी करीत असते. पण वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणी तिला आजूबाजूला हव्या असतात आणि हा मित्रपरिवार एका अर्थाने तिचे आयुष्य घडवायला मदत करतो, अशी माहिती देत असतानाच नैना ही माझ्यासारखी मला वाटली नाही, परंतु, या चित्रपटात रणबीरची जी व्यक्तिरेखा आहे ती खरोखरच त्याच्या आयुष्याच्या जवळ जाणारी आहे असे मला सतत वाटते, असेही दीपिकाने आपले निरीक्षण नोंदवले. नैनाच्या आयुष्यात ज्या घटना घडल्यात त्या थोडय़ाफार फरकाने मीही अनुभवल्या आहेत. पण तरीही नैना माझ्यासारखी असं मी म्हणू शकणार नाही. पण रणबीरची व्यक्तिरेखा मात्र त्याला चपखल लागू पडते आणि त्यालाही पटली असणार, असे आपल्याला वाटत असल्याचेही तिने सांगितले.
माधुरी, मी आणि घागरा..
मी माधुरीचा लहानपणापासून चाहता आहे. तिचं लग्न झालं तेव्हा लाखो तरुणांचा प्रेमभंग झाला त्यात एक नाव माझंही होतं. पण इतक्या वर्षांनी माधुरीसोबत ‘घागरा..’ सारखं गाणं करायला मिळणं ही एक अप्रतिम संधी होती. माधुरी एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून मला नेहमी आश्चर्यचकित करते. ‘घागरा..’ करत असताना सेटवर तिच्याबरोबर तिची मुलंही होती. एक आई म्हणून सेटवर त्यांची काळजी घेणं, दुसरीकडे नृत्याची दृश्यं समजावून घेणं, आल्या-गेल्या प्रत्येकाशी बोलणं, विचारपूस करणं आणि एका क्षणाला शॉट रेडी म्हणताच तितक्याच नजाकतीने एक अदाकारा म्हणून नृत्य करणं.. एक नावाजलेली कलाकार, एक पत्नी, एक आई आणि सर्वात महत्त्वाचं एक व्यक्ती म्हणून तितक्याच प्रभावीपणे वावरणं या सगळ्या जबाबदाऱ्या, भूमिका माधुरी ज्या लीलया पार पाडते ते पाहून मी तिच्या अधिकच प्रेमात पडलो, असे रणबीर म्हणाला.