रणबीरला सलमानचा ‘दबंग’ आवडला. त्याला चुलबुल पांडेसारखी धमाल व्यक्तिरेखा करायची होती. म्हणून त्याने अभिनव कश्यपबरोबर ‘बेशरम’ केला. त्याला गुप्तहेराची भूमिका करायची होती म्हणून त्याने अनुराग बसूबरोबर पुन्हा एकदा ‘जग्गा जासूस’चा खेळ मांडला आहे. आणि आता त्याहीपुढे जात त्याला सुपरहिरो व्हायचे आहे म्हणून आपला मित्र दिग्दर्शक अयान मुखर्जीला हाताशी घेऊन तो सुपरहिरोवर आधारित चित्रपटाची तयारी करतो आहे. पण, आपला सुपरहिरो ‘क्रिश’पेक्षा एकदम वेगळा आहे, हे त्याने मुद्दाम स्पष्ट केले आहे. रणबीरच्या या सुपरहिरोपटाचे नावही निश्चित झालेले नाही. पण, हा चित्रपट ‘क्रिश’ पेक्षा वेगळा असेल. हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक आणि थोडासा जादुई कथा-कल्पनांवर आधारित असणार आहे. अयानने त्याची कथा लिहायला सुरुवात केली असून तीन भागांत ही कथा लिहिली जाणार असल्याने ही चित्रत्रयी असेल असे म्हणायला हरकत नाही, असेही रणबीरने म्हटले आहे. रणबीरने हा चित्रपट केला तर ह्रतिक आणि शाहरूखमागोमाग सुपरहिरो साकारणारा रणबीर तिसरा बॉलिवूड अभिनेता असेल. ‘वेक अप सिद’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटानंतर अयान आणि रणबीर ही जोडी तिसऱ्यांदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. अयानबरोबर माझे विचार जुळतात. त्यामुळे त्याच्याबरोबर हा चित्रपट करणे माझ्यासाठी योग्यच आहे, असे रणबीर म्हणतो. सध्या तरी या चित्रपटाचे प्राथमिक स्तरावर काम सुरू आहे. दरम्यान, अयान पोस्ट प्रॉडक्शनच्या प्रशिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने तो परत आल्यानंतरच या चित्रपटाचे काम सुरू होईल, असे त्याने सांगितले. तोपर्यंत अनुराग क श्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट आणि इम्तियाज अलीचा एक चित्रपट असे दोन चित्रपट आपल्याला पूर्ण करायचे आहेत, असे त्याने स्पष्ट केले. इंडस्ट्रीत प्रवेश के ल्यापासून विविध भूमिका साकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रणबीरला अ‍ॅक्शनहिरोही साकारायचा आहे. त्यासाठी गेली कित्येक वर्ष मी शरीर कमावण्याचा प्रयत्न करतो आहे पण, मला यश मिळत नाही आहे. तरीही मी अ‍ॅक्शनपट करणार. कारण अ‍ॅक्शन करण्यासाठी केवळ ताकदवान शरीर असून चालत नाही. त्यासाठी तुमच्या नजरेतून व्यक्त होणारा राग आणि न्याय मिळवण्यासाठी तुम्ही जी कृती करता ती महत्त्वाची असते, असे आता आपले ठाम मत असल्याचे रणबीरने स्पष्ट केले.