रामनारायण रुईया महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ८ आणि ९ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘रसमहोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या रसमहोत्सवात ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे मुख्य बीजभाषण होणार आहे. त्यानंतर साहित्य, नृत्य, नाटय़, संगीत, शिल्प या विषयातील तज्ज्ञ व्याख्याते आणि कलाकार ‘रस- अविष्कार आणि आस्वाद’ या विषयावर सप्रयोग व्याख्याने होणार आहेत.
भरतमुनी यांनी ‘नाटय़शास्त्र’ या ग्रंथात रस ही संकल्पना मांडली असून तिचे सविस्तर विवेचनही केले आहे. रस हा नाटय़ाचा प्राण आहे. पण भरतमुनींची रस संकल्पना केवळ नाटय़ापुरतीच मर्यादित नाही. तर नाटय़ाशिवाय साहित्याच्या सर्व प्रकारात रस हे मूलभूत तत्व आहे. इतकेच नव्हे तर सर्व कलांचाही गाभा रस हाच आहे. रसिक आणि भ्यासकांना याचा परिचय व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  महोत्सवात डॉ. अरुणा ढेरे (साहित्य), विजय केंकरे (नाटक), डॉ. सुचेता भिडे-चाफेकर (नृत्य), पं. सत्यशील देशपांडे (गायन), उदयन इंदूरकर (शिल्प) हे मान्यवर आपल्या व्याख्यानातून या विविध कला प्रकारातील रस या विषयाचा आढावा घेणार आहेत. महोत्सवाचा समारोप ‘रसदर्शन’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाने होणार आहे.या रसमहोत्सवाबाबत अधिक माहिती आणि प्रवेशासाठी इच्छुकांनी प्रा. डॉ. मंजुषा गोखले (९८६७९२०३००), प्रा. प्रसाद भिडे (९०२९१५००१), तरंगिणी खोत (८६९२९८८८६४), स्वाती जाधव (९३२३२२४९७३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.