दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा आणि वणी-कळवण रस्त्यालगत काही अवैध हॉटेल्स असून हॉटेलमधील सांडपाणी जागीच सोडण्यात येत असल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
राज्य मार्ग क्रमांक २३ आणि १७ या मार्गावर वणी येथे दुतर्फा अतिक्रमण करीत हॉटेल व्यवसाय फोफावला आहे. गुजरातमधून येणारे पर्यटक तसेच सप्तशृंग गडावर जाणारे भाविक हे प्रामुख्याने त्यांचे गिऱ्हाईक. वळणावरच ही हॉटेल्स असल्याने हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनांमुळे विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसण्यास अडथळा येत असल्याने अनेक अपघात घडले आहेत.
वारंवार होणारे अपघात आणि व्यावसायिक संघर्षांतून होणारे वाद यातूनच तक्रारी वाढू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अतिक्रमण काढण्यासाठी नोटीसही पाठवली होती. परंतु पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. काही राजकीय व्यक्तींचे हितसंबंध असल्याने कार्यवाही होत नसल्याची चर्चा आहे. हॉटेलांमधील सांडपाणी रहिवाशांच्या घरांजवळ काढले जाते. स्थानिकांनी हॉटेल व्यावसायिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता रहिवाशांनाच दमदाटी ऐकावी लागली.
सांडपाण्याच्या दरुगधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले असून परवाना नसतानाही  सुरू असलेल्या हॉटेलांवर कारवाई करावी,  सांडपाण्याची योग्य ती व्यवस्था करण्यासाठी त्यांना भाग पाडावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी   संबंधितांकडे  केली आहे.