मोबाइल हॅण्डसेटच्या आयएमइआय क्रमांकात संगणकाच्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे फेरफार करून माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील एस मोबाइल शॉपीचे चालक स्नेहल बाफना (रा. गुरुवार पेठ, कराड) यास दोषी धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. पी. आर. भावके यांनी दोन वष्रे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कराडच्या गुरुवार पेठेतील एस. मोबाइल शॉपीमध्ये चोरीचे मोबाइल हॅण्डसेटचे मूळ आयएमइआय क्रमांक बदलून जुन्या मोबाइल हॅण्डसेटची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना ९ जानेवारी २००५ रोजी मिळाली होती. त्यावरून शहर पोलिसांनी ११ जाानेवारीला गिऱ्हाईक व पंचासह एस. मोबाइल शॉपीवर छापा घातला. या छाप्यात शॉपी मालक स्नेहल बाफना यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच शॉपीत आढळून आलेले मोबाइल संच व आयएमइआय क्रमांक बदलण्यासाठी वापरण्यात येणारी संगणकीय यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली. संगणक तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर शॉपीतील संगणकीय साधनसामग्री आढळून आली. त्यावर शहर पोलिसांनी भा.द.वि.स. कलम ४११, ४१३ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ व ६६ अनुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. कराड शहर पोलिसात दाखल झालेला हा गुन्हा माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सातारा जिल्ह्यात दाखल झालेला पहिला गुन्हा ठरला.  
या खटल्याची सुनावणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. पी. आर. भावके यांच्यासमोर झाली. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे सात व बचाव पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. शामप्रसाद बेगमपुरे यांनी केलेला युक्तिवाद व सादर केलेला पुरावे ग्राह्य मानून न्या. पी. आर. भावके यांनी या खटल्यातील आरोपी स्नेहल बाफना यास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ अनुसार दोषी धरून दोन वष्रे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.