दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी महसूल पथकासोबत गेलेले गावचे सरपंच श्रीशैल पाटील (वय ४०) यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. वाळू माफियांनी हल्ला करण्याची दुसरी घटना पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे झाली. यात मसहूल पथकाला मारहाण झाली.
दरम्यान, माढा तालुक्यात तहसील विभागाच्या भरारी पथकाने भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जाळून टाकल्या. संबंधित बोटी मालकांची नावे स्पष्ट होऊ शकली नाहीत.
दक्षिण सोलापूर तालुक्यात राजकीय ताकदीचा वापर करून वाळू माफिया गब्बर होत आहेत. त्याविरोधात अनेक गावच्या ग्रामस्थांनी आंदोलने केली. परंतु वाळू माफियांवर कारवाई होत नाही. उलट, या तालुक्यात तहसीलदार आपला कार्यकाळ पूर्ण करण्याऐवजी बदली करून घेत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चार तहसीलदार आले आणि गेले. अलीकडे एका महिला तहसीलदाराने दक्षिण सोलापूरची सूत्रे स्वीकारली असून त्या आपला कार्यकाळ किती दिवसात आटोपणार याबद्दल शंका उपस्थित होत आहे. या पाश्र्वभूमीवर तेलगाव येथे भीमा नदीच्या पात्रात वाळू उपसा होत असल्याने त्यावर कारवाई करण्यासाठी तहसील विभागाचे भरारी पथक गेले होते. या पथकासोबत तेलगावचे सरपंच श्रीशैल पाटील हे होते. कारवाई होत असताना वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला. यात सरपंच पाटील यांना ‘लक्ष्य’ बनविण्यात आले. या वेळी मंडल अधिकारी अ. रझाक मकानदार यांनी वाळू माफियांना पिटाळून लावण्यासाठी हवेत गोळीबार केला. याप्रकरणी रमेश भांजे, राजू भांजे, अमोगसिध्द भांजे यांच्यासह बारा जणांवर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोरांना दुसऱ्या दिवशीही अटक झाली नव्हती.
वाळू माफियांनी पंढरपूर तालुक्यातही उच्छाद मांडला असून तेथील शेगाव दुमाला येथे भीमा नदीच्या पात्रात होणारी वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या भरारी पथकावर हल्ला झाला. यात बाभळगावचे तलाठी दिवाकर मिठे हे जखमी झाले. हल्लेखोरांची संख्या २० पर्यंत होती. मंडल अधिकारी चंद्रकांत मोरे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार मुन्ना आटकळे, चंद्रकांत आटकळे, मंगेश आटकळे यांच्यासह १५जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.