रस्ता बांधण्यापेक्षा जास्त आनंद एखाद्याला दृष्टी देता येत असेल तर होतो. नेत्रचिकित्सा व चष्मे वाटपाच्या कार्यक्रमांना मी आवर्जून जातो, कारण त्यातून मिळणारे समाधान फार मोठे असते. संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवू. त्यांच्या समस्या सोडविण्याचा जो संकल्प सोडला आहे तो लाख मोलाचा आहे. या संकल्पाच्या पाठिशी सदैव राहील, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मामला या गावी नि:शुल्क नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मेंढे होते.
व्यासपीठावर प्रतिष्ठानचे सचिव सुभाष कासनगोट्टवार, उपाध्यक्ष संजय रामगीरवार, भाजपचे सरचिटणीस प्रमोद कडू, वनिता कानडे, तुषार सोम, जिल्हा उपाध्यक्ष रामपालसिंग, नगरसेवक राहुल पावडे, मीरा खनके, दयानंद बंकुवाले, हनुमान काकडे, मामलाच्या सरपंच सुलोचना कोकडे उपस्थित होते. संकल्प लोकसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पहिल्या दोन शब्दातच कार्याची आणि समाजाप्रती दृढनिश्चयाची ओळख अधोरेखित होते. समाजाचे देणे लागतो या भावनेतून या संस्थेची निर्मिती झाली आहे. असेही मुनगंटीवार म्हणाले.
संकल्प प्रतिष्ठानला आमदार मुनगंटीवार यांचे नेहमीच सहकार्य मिळेल, अशी भावना महेश मेंढे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय रामगीरवार यांनी केले. संचालन सुभाष कासनगोट्टूवार यांनी, तर आभार गौतम निमगडे यांनी मानले. दिवसभर चाललेल्या या शिबिरासाठी नागपूर येथील डॉक्टरांची चमू तसेच राहुल पावडे, भारत काटवले, विजय गिरी, सज्जाद अली, सारोबा अली, सुनील डोंगरे, अमिन शेख, मून, प्रदीप बोरकर, रवी बोरसरे, अशोक आक्केवार, शरद नरसिंगकर, हाशीवंत चापले, प्रमोद शास्त्रकार यांनी परिश्रम घेतले.