सोलापूर जिल्ह्य़ातील यंदाच्या दुष्काळात मुक्या जनावरांसाठी उभारल्या गेलेल्या चारा छावण्यांमध्ये बनावटगिरी आढळून आली असून यात ‘दुष्काळ माफियांनी’ चाऱ्याचे अनुदान फस्त केल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालाद्वारे समोर आली आहे. चारा छावण्यांमध्ये तब्बल सात हजार ५३० जनावरांची तफावत आढळून आली असून हा बनवेगिरीचा प्रकार असल्याचा संशय बळावला आहे.
जिल्ह्य़ात यंदाच्या वर्षी पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुळातच सोलापूर हा जिल्हा खरीप नसून तर रब्बी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेहमीप्रमाणे यंदा खरीप हंगामात पाऊस पडला नव्हता. तसेच रब्बी हंगामातही पावसाने साथ दिली नाही. मात्र पन्नास टक्क्य़ांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या भागात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष विचारात घेऊन सोलापूर जिल्ह्य़ात बार्शीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला होता. यात सुरुवातीला मुक्या जनावरांसाठी चारा डेपो सुरू करणयात आले होते. या चारा डेपोंच्या माध्यमातून सुमारे ८७ कोटींचा चारा उपलब्ध करून दिला गेला. त्यावेळी जनावरांची संख्या सुमारे २२ लाख एवढी दाखविण्यात आली होती. नंतर शासनाने बदल केलेल्या धोरणानुसार १५ ऑगस्टनंतर चारा डेपोऐवजी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. यात जिल्ह्य़ात सुमारे दोनशे चारा छावण्या सुरू झाल्या. मात्र यातील जनावरांची संख्या एक लाखाच्या पुढे जाऊ शकली नाही. चारा छावण्यांवर शासनाकडून सुमारे ६० कोटींचे अनुदान मिळाले. चारा डेपो व नंतरच्या चारा छावण्यांची सर्वाधिक संख्या सांगोला तालुक्यात असून त्याठिकाणी सुमारे शंभर कोटींचा चारा जनावरांना खाऊ घालण्यात आल्याचे दर्शविले गेले. अशीच बाब पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या संदर्भात नमूद करता येईल.
चारा छावण्या व पाण्याच्या टँकर मागे विशिष्ठ राजकीय पुढाऱ्यांनी जास्तीचा ‘रस’ दाखविल्यामुळे प्रशासन यंत्रणाही राजकीय दबावाखाली कार्यरत होती. त्यामुळेच की काय, जनावरांच्या छावण्यांसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष पाळले जातात की नाही, याची पडताळणी होत नव्हती. छावण्यांमध्ये दाखल जनावरांचे बारकोडिंग करण्याचे बंधन जवळपास कोठेही पाळले गेले नाही. तसेच व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक असताना त्याकडेही दुर्लक्ष झाले. तसेच यापूर्वी चारा डेपो असताना जनावरांची (सुमारे २२ लाख) भरमसाठ प्रमाणात दाखविण्यात आलेली संख्या व नंतर चारा छावण्या सुरू झाल्या तेव्हा प्रत्यक्षात दाखविण्यात आलेली जनावरांची संख्या (एक लाख-बारकोडिंग व व्हिडिओ चित्रण-शासन निकषाचे पालन नसताना) याचा विचार करता चारा घोटाळा झाल्याचा संशय निर्माण झाला होता. याबद्दल सातत्याने ओरड सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर अखेर जिल्हा प्रशासन जागे झाले. जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या आदेशानुसार जिल्ह्य़ातील चारा छावण्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. सांगोल्यासह जवळपास सर्व तालुक्यांतील चारा छावण्यांध्ये संशयास्पद प्रकार आढळून आले.
सांगोला तालुक्यातील ९३ चारा छावण्यांपैकी ७२ छावण्यांमध्ये जनावरांची संख्या नगण्य असून येथील एका चारा छावणीच्या तपासणीमध्ये नोंदीपेक्षा तब्बल ३३५ जनावरांची संख्या कमी आढळून आली. माढा (६), मोहोळ (९), करमाळा (८), पंढरपूर (२) याप्रमाणे चारा छावण्यांची तपासणी करण्यात आली. यात एकंदरीत सात हजार ५३१ जनावरांची तफावत आढळली. याबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून आणखी तपासणी झाल्यानंतर चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता शासकीय यंत्रणेच्या वर्तुळात वर्तविली जात आहे.
जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी चारा छावण्यांची तपासणी मोहीम हाती घेतल्यानंतर संशयास्पद व्यवहार आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी या तपासणीची व्याप्ती वाढविली आणि त्यात चारा छावण्यात भ्रष्टाचार आढळून आल्यास संबंधित ‘दुष्काळ माफिया’वर कोणती कारवाई केली जाणार हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam in drought at solapur