खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेची चौकशी व्हावी व मृताच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे खापरखेडा परिसरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. सुरक्षा रक्षकाची आत्महत्या किंवा अपघात नसून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सुनील उपाख्य सोनू मनोहर गावंडे असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून तो खापरखेडा वार्ड क्रमांक ३ मध्ये राहात होता. खापरखेडामधील नवीन ५०० मेगाव्ॉट औष्णिक वीज केंद्रात असलेल्या कलोटी सुरक्षा कंपनीत तो गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत होता. गुरुवारी रात्री दुपारी ४ ते रात्री १२ या वेळेत कामाला होता. त्याचा दुसरा साथीदार कामावर न आल्याने त्यालाच रात्री १२ ते सकाळी ८ यावेळेत काम करण्यास अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास परिसरात कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्याने मुख्य प्रवेशद्वारावर असलेला राजू कचरे हा सुरक्षा रक्षक त्या भागात पाहण्यासाठी गेला असता सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसले. राजने मुख्यप्रवेशद्वारावर घटनेची माहिती दिली.
वीज केंद्रातील रुग्णवाहिकेने सुनीलला मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. सुनीलच्या पार्थिवाचे विच्छेदन केल्यावर खापरखेडाला त्याच्या निवासस्थानी नेताना कामगारांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ कामगारांना अडविल्यामुळे आंदोलन चिघळले. लोकांनी दगडफेक सुरू केली आणि कामगारांनी प्रवेशद्वार तोडून आतमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलक समोर जाऊ शकले नाहीत त्यामुळे आंदोलकांनी ठिय्या दिला. जोपर्यंत या घटनेची चौकशी होऊन आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला.
मृताच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. वीज केंद्राचे उपमुख्य अभियंता चंद्रागडे, पी. एम. निखाडे आणि सुरक्षा अधिकारी नरेश राऊत यांच्यासह पोलिसांनी मध्यस्थी करीत वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मदतीची आणि चौकशीची मागणी पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच कामगार आक्रमक झाले. सुनीलचा मृत्य अपघाती नसून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप कामगार आणि नातेवाईकांनी केला. शेवटी कामगार नेत्यांनी मध्यस्थी करून मृताच्या कुटुंबीयांना एक लाख दहा हजार रुपयांची तातडीची मदत देऊन नियमाप्रमाणे आणखी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले आणि आंदोलक शांत झाले.
रात्री उशिरा सुनीलच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अपघाती मृत्यूंची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पोलीस या प्रकरणात पुढील कारवाई करणार असल्याची माहिती खापरखेडा पोलिसांनी दिली.
दरम्यान, सुनीलचा मृत्यू अपघात आहे की घातपात आहे हे संध्या सांगता येणार नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यानंतर खरे सत्य बाहेर येईल, असे सुरक्षा अधिकारी नरेंद्र राऊत यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2013 रोजी प्रकाशित
सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू; कामगारांच्या आंदोलनाने तणाव
खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेची चौकशी व्हावी व मृताच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कामगारांनी केलेल्या आंदोलनामुळे खापरखेडा परिसरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते.
First published on: 09-02-2013 at 02:53 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security guard died workers andolan