बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्रातील शीख बांधव सुरक्षित आहेत. १९८४ साली दिल्लीतील शीख हत्याकांडात असंख्य शिखांचा बळी गेला, परंतु त्या वेळी मुंबईसह महाराष्ट्रात शीख बांधवांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही; तो बाळासाहेबांमुळेच, असे मत शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मोळी (ता. खंडाळा) येथे वीर धरणाच्या पात्रालगत ‘धर्मगुरु गुरुनानक’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ शिवसेना अध्यक्ष उद्धव राऊत, मिलिंद नार्वेकर, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, संजय मोहिते, हणमंत चवरे आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले,‘‘ १९८४ मध्ये बाळासाहेबांनी मुंबईचे रक्षण केले. त्याबाबत तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदनही केले. शीख बांधवांचे प्रेरणास्थान असणाऱ्या गुरुनानक यांच्या चित्रपटाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यांची माहिती समाजापुढे येणे आवश्यक आहे,’’ असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले,की मराठी व शीख बांधव एकत्र आले तर मातृभूमी सुरक्षित राहील. चित्रपटाच्या चित्रीकरणाचा हा शुभारंभ आहे. त्यामुळे राजकीय धाटणीचे भाषण येथे नाही.
चित्रीकरण पाहायला परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.