कोणतीही पूर्वकल्पाना न देता, कागदपत्रांची तपासणी न करताच गणपतराव कदम मार्गावरील दुकानांवर बुलडोझर फिरविल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी गुरुवारी पालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाचा ताबा घेऊन आंदोलन केले. साहाय्यक आयुक्तांना निलंबित करून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी दिवसभर पालिका कार्यालयात ठिय्या मांडला होता.
गणपतराव कदम मार्गावर गेली ५० वर्षे जुन्या चार स्टॉलवर पालिकेने बुधवारी बुलडोझर फिरविला. एखादे अनधिकृत बांधकाम तोडताना संबंधितांवर नोटीस बजावण्यात येते. आवश्यक ती कागदपत्रे नसल्यास ठरावीक मुदत देऊन बांधकाम तोडले जाते. अशा प्रकारची कोणतीही नोटीस या स्टॉलमालकांना देण्यात आलेली नव्हती. बुधवारी अचानक पालिकेने ही कारवाई केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जी-दक्षिण विभाग कार्यालयामध्ये आंदोलन केले. पालिका अधिकाऱ्यांविरोधी घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी कार्यालयाचा ताबा घेतला. आंदोलनाचे वृत्त समजताच पालिकेचे उपायुक्त आनंद वाघराळकर जी-दक्षिण कार्यालयात पोहोचले. मात्र आयुक्त अजय मेहता यांच्याशिवाय कुणाशी बोलणी करणार नाही, असा पवित्रा सुनील शिंदे यांनी घेतला. विकासकांना मदत करण्यासाठी हे स्टॉल तोडण्यात आल्याचा आरोप सुनील शिंदे यांनी केला. साहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. अखेर सायंकाळी अजय महेता यांच्याबरोबर मोबाइलवर बोलणे झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.