२२ मे १९९१ रोजीची आठवण सांगताना जॉन अब्राहम म्हणाला की, सकाळी आईने झोपेतून उठविले तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू होते. काय झाले म्हणून विचारले तेव्हा ती म्हणाली तत्काली पंतप्रधान राजीव गांधी यांची काल रात्री हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा त्या वेळी अर्थ समजावून घेण्याएवढा मी वयाने मोठा नव्हतो परंतु, या हत्येचे वृत्त आणि घटनाक्रम वाचला तेव्हा ही घटना मनात घर करून राहिली होती एवढे मात्र नक्की जाणवले, असे जॉन अब्राहमने नमूद केले. ‘मद्रास कॅफे’ हा सिनेमा राजीव गांधी हत्येच्या कटामागची पाश्र्वभूमी विषद करणारा आहे, त्यावर आधारित आहे हे समजल्यावर अर्थातच सिनेमाच्या कथानकाशी निगडित झालो. चित्रपटाचे क्लायमॅक्सचे चित्रण हे खूप आव्हानात्मक ठरले.
यादवी युद्ध हा चित्रपटाचा मूळ विषय आहे आणि तेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. आतापर्यंत हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर आपल्या शेजारील देशांतील यादवी युद्धाचा कालखंड, त्यात निरपराधांचे हकनाक गेलेले बळी, दु:ख याचे चित्रण पहिल्यांदाच करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या गुप्तहेर संस्थेचा अधिकारी म्हणून मेजर विक्रम सिंग गुप्तहेर म्हणून श्रीलंका यादवी युद्धाच्या पाश्र्वभूमीवर जाफन्याला जातो. त्याचा प्रवास, त्याला उमगलेले सत्य, विविध घटनांमध्ये राजकीय स्तरावर चाललेली प्रक्रिया आणि युद्धातील दोन्ही बाजूंना जगभरातून मिळणारी शस्त्रास्त्र, पैसा यांची मदत, राजकीय परिणाम हे त्याच्या या प्रवासातून दाखविल्याचे दिग्दर्शक शूजित सरकार म्हणाले.
हा चित्रपट करताना सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे श्रीलंकेमधील यादवी युद्धातील घटक आणि राजकीय स्तरावरील चित्रण करताना कोणत्याही घटकापैकी कोणाचीही बाजू न घेता, कुणाचाही कैवार न घेता त्रयस्थपणे त्यांचे चित्रण करणे हेच होते. हॉलीवूडच्या जेएफके किंवा आगरे, बॉडी ऑफ लाईज या पद्धतीचा सिनेमा आम्ही केला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रेक्षकाला समजेल असा पद्धतीचे चित्रण, मांडणी केली आहे, असे जॉनने सांगितले. मलेशिया, पोलण्ड, तसेच पूर्व युरोपातील काही देशांमध्येही आपण चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे जॉन आणि सरकार म्हणाले.
तामिळनाडूच्या कोची परिसरात जाफना शहराची प्रतिकृती उभी करण्यात आली असून ‘मद्रास कॅफे’ नामक हॉटेल नेमके कुठे आहे ते आम्ही दाखविलेले नाही. परंतु, सगळा कट त्या कॅफेमध्ये रचतो असे दाखविल्याने त्याचे शीर्षक सिनेमाला दिले आहे,
असेही शूजित सरकार म्हणाले. गाणी, नृत्य आणि नेहमीचे मनोरंजन चित्रपटात नसले तरी हा चित्रपट प्रेक्षकाची बौद्धिक करमणूक नक्कीच करणारा आहे. त्याचबरोबर देशातील अशा एका महत्त्वाच्या घटनेचे चित्रण करणारा आहे ज्या घटनेनंतर
देशाचा राजकीय इतिहासच पूर्णपणे
बदलून गेला आहे, त्या अर्थाने चित्रपट महत्त्वाचा ठरतो, असे जॉन अब्राहमने आवर्जून नमूद केले.

गुप्तहेर संस्थांचे काम कसे चालते याची झलक दाखविण्याबरोबरच श्रीलंकेत झालेल्या यादवी युद्धाचे हिंदी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर चित्रण करण्यात आलेला ‘मद्रास कॅफे’ हा पहिलाच चित्रपट आहे, असे सांगून श्रीलंकेतील यादवी युद्धाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती याचे दर्शन घडविताना यातील कोणत्याही एका घटकाच्या बाजूने सिनेमा केलेला नाही, असे विधान अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहमने ‘स्क्रीन’ साप्ताहिकातर्फे आयोजित ‘स्क्रीन प्रिव्ह्य़ू’ या कार्यक्रमात बोलताना केले.