विलंबानेच होत असलेली महानगरपालिकेची स्वीकृत नगरसेवकांची निवड वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय पक्षांच्या गटनोंदणीनुसार प्रशासनाने ठरवलेल्या मूल्यांकनास शिवसेनेने विरोध दर्शवला असून, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मूल्यांकनास आक्षेप घेताना, शिवसेनेसाठी स्वीकृतच्या दोन जागांची मागणी केली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीनंतर येत्या शनिवारी दुसरी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. पहिल्या सभेत महापौर, उपमहापौरांची निवड करण्यात आली. त्यानंतर कामकाजावर होणारी ही पहिलीच सभा आहे. या सभेत स्थायी समितीचे सदस्य, महिला बालकल्याण समतीचे सदस्य आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय ठेवण्यात आला असून, सभेच्या अजेंडय़ामध्येच नमूद करण्यात आलेल्या पक्षनिहाय सदस्यांच्या मूल्यांकनाला शिवसेनेने विरोध केला आहे. शिवसेना व अपक्ष आघाडीचे गटनेते संजय शेंडगे यांनी सोमवारी याबाबत मनपाचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांना पत्र देऊन हा विरोध नोंदवला. त्यामुळेच या निवडी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
प्रशासनाने केलेल्या मूल्यांकनानुसार स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि नवनिर्माण सेना या सर्व पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. यातील मनसेच्याच जागेला शिवसेनेचा आक्षेप असून त्याऐवजी शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत करावे अशी त्यांची मागणी आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या गटनोंदणीनुसार राष्ट्रवादीच्या शहर विकास आघाडीचे २३ (पाच अपक्षांसह), काँग्रेसचे ११, शिवसेना व अपक्ष आघाडीचे १८ (एका अपक्षासह), भाजपचे ९ आणि मनसेचे ४ याप्रमाणे संख्याबळ आहे. चार अपक्षांनी महसूल आयुक्तांकडे गटनोंदणीच केलेली नाही. त्यांनी स्थायी समितीवर जाण्यात ही तांत्रिक अडचण ठरू शकते.
या संख्याबळानुसार मनपा प्रशासनाने शिवसेनेचे मूल्यांकन १.३२ केले असून, मनसेचे ०.२९ आहे. त्यालाच शिवसेनेचा आक्षेप आहे. निकषानुसार १३.६ मूल्यांकनाला एका स्वीकृत सदस्याची निवड होऊ शकते. त्यानुसार शिवसेनेला दोन जागा मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे.
गटनोंदणीच्या याच मूल्यांकनानुसार १६ सदस्यांच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीचे ५, काँग्रेसचे २, शिवसेनेचे ४, भाजपचे २ आणि मनसेचा १ याप्रमाणे १४ जागांची नियुक्ती करण्यात येणार असून सभेच्या अजेंडय़ाचे हे सूत्रही देण्यात आले आहे. २ जागांबाबत मात्र यात उल्लेख नाही. महिला व बालकल्याण समितीसाठीही हेच संख्याबळ निश्चित करण्यात आले आहे. स्थायी समितीसाठीही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही रस्सीखेच आहे. कोटय़ानुसार उपलब्ध होत असलेल्या जागांपेक्षा अधिक सदस्य त्यासाठी इच्छुक आहेत. शिवाय सभापतिपदासाठी राष्ट्रवादी आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्षांतही स्पर्धा आहे.
स्वीकृतसाठी चुरस
स्वीकृत सदस्यांसाठी उबेद शेख (काँग्रेस), कैलास गिरवले (मनसे), अभय आगरकर (भाजप), विक्रम राठोड (शिवसेना) यांची नावे निश्चित असल्याचे सांगण्यात येते. मात्र भाजपमध्ये भैया गंधे, शिवसेनेत सुधीर पगारिया, मनसेत सतीश मैड यांनीही या पदासाठी दावा केल्याचे समजते. राष्ट्रवादीत इच्छुकांची संख्या मोठी असून हीच त्यांची डोकेदुखी ठरली आहे. मनपाचे माजी विरोधी पक्षनेते विनीत पाऊलबुद्धे, शंकरराव घुले आदी नावे चर्चेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
स्वीकृतच्या निवडी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे
विलंबानेच होत असलेली महानगरपालिकेची स्वीकृत नगरसेवकांची निवड वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय पक्षांच्या गटनोंदणीनुसार प्रशासनाने ठरवलेल्या मूल्यांकनास शिवसेनेने विरोध दर्शवला असून, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मूल्यांकनास आक्षेप घेताना, शिवसेनेसाठी स्वीकृतच्या दोन जागांची मागणी केली आहे.
First published on: 11-02-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signs to be controversial selection of approved