तारखेप्रमाणे आलेली छत्रपती शिवाजीमहाराज जयंती बुधवारी शहरासह जिल्ह्य़ात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली होती. नगर शहरात सकाळी मोठी व दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली.
माळीवाडा बसस्थानकजवळील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची सकाळी ८ वाजताच जिल्हाधिकारी अनिल कवडे, महापौर संग्राम जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, विश्वस्त रामनाथ वाघ, विश्वासराव आठरे आदी या वेळी उपस्थित होते. ढोल-ताशांच्या निनादात या वेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला. विविध शाळांमधील विद्यार्थी, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पुतळ्याच्या पूजनानंतर सकाळी ९ वाजता येथूनच शिवजयंतीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. संभाजी ब्रिगेड, विविध संघटना या मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाहने रथांसारखी सजवण्यात आली होती. शिवरायांसह मावळ्यांच्या वेषात विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची ढोल व झांजपथकेही मिरवणुकीत होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही मिरवणूक लाल टाकी रस्त्यावरील हुतात्मा चौथे शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याजवळ गेली. येथे मिरवणुकीचे विसर्जन झाले.
शहरातील विविध शाळा, संस्था व संघटनांनीही बुधवारी शिवजयंती उत्साहत साजरी केली. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिल्हयातही अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या मोठय़ा मिरवणुका काढण्यात आल्या.