सध्याच्या बदलत्या काळात अनेक संस्था शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धनाचे काम आपापल्या परीने करीत असून नव्या पिढीला शास्त्रीय संगीताचे धडे देत आहेत. या पैकी बहुतेक संस्था कोणाच्याही मदतीखेरीज शास्त्रीय संगीताच्या प्रसाराचे काम करत असून अशा संस्थांच्या कामाची दखल राज्य शासनाकडून घेण्यात आली आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आर्थिक मदतीचे कोंदण लाभणार आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी हे अनुदान देण्यात येणारअसून सहा संस्थांना प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे हे अनुदान दिले जाणार आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षांसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सुमारे शंभर अर्ज आले आहेत. आलेल्या सर्व अर्जाची छाननी करून लवकरच अनुदानप्राप्त संस्थांची नावे जाहीर केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक संचालनालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली.  
खासगी दूरचित्रवाहिन्यांचे आक्रमण, त्यावरील रिअ‍ॅलिटी शो किंवा अन्य संगीत कार्यक्रमातून शास्त्रीय संगीताची होणारी उपेक्षा, नव्या पिढीची बदललेली संगीतातील अभिरुची, पॉप, रॉक आणि अन्य प्रकारच्या संगीताचे वाढते प्राबल्य याचे मोठे आव्हान भारतीय शास्त्रीय संगीतापुढे निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.
अर्ज करणारी संस्था पूर्णपणे शास्त्रीय संगीत क्षेत्रात काम करणारी असावी, नोंदणी अधिनियम व सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत संस्थेची नोंदणी झालेली असावी, संस्थेने किमान दहा वर्ष या क्षेत्रात काम केलेले असावे, संस्थेतर्फे वर्षभर सातत्याने शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम सादर झालेले असावेत अशा काही अटी अनुदान मिळविण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. जी संस्था शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धन यासाठी काम करत असेल तर त्या संस्थेला प्राधान्य देण्यात येणार आहे. एखाद्या संस्थेला अनुदान मिळाले की पुढील चार वर्षे त्या संस्थेला अनुदान देण्यात येणार नाही.