दीडशेव्या वर्षांत पदार्पण करीत असलेल्या सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय सप्ताहानिमित्त विविधांगी व्याख्यानमालेची सहा पुष्पे, वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, कार्यवाह डॉ. जयंत आठवले आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रसिक श्रोत्यांना वैचारिक खाद्य देत गुंफली गेली.   
राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वसमावेशक असून सतत विस्तारत आहे. भाषावृद्धीकरिता सर्व भाषिकांनी उदार वृत्ती बाळगावी, असे विचार विविध उहादरणे देत प्रा.
डॉ. मधुलता व्यास यांनी ‘हिंदी की व्यावहारिकता और व्यक्तित्व’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
‘ज्ञानेश्वरांची निरुपण पद्धती’ या विषयावर लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर म्हणाले, ज्ञानेश्वरांना त्यांच्या बोलण्याचा भावार्थ जनसामान्यांना कळावा याची तळमळ होती.
याकरिता प्रासादिक, मधुर भाषेतून दृष्टांताची भरमार करीत आत्मविश्वासाने ते निरुपण करतात. श्रोत्यांचे अवधान त्यांना अतिमहत्त्वाचे वाटते.
‘बालसंरक्षणाची सद्यस्थिती व सामाजिक वास्तव एक विदारक सत्य’ या विषयावर बोलताना डॉ. विशाखा सुधीर गुप्ते यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे कुपोषण, बालमृत्यू, अंधश्रद्धा, अज्ञान, बालविवाह, उपासमार, जगण्याचा हक्क अशा विविध गोष्टींवर प्रकाशझोत टाकत सामाजिक उदासीनता स्पष्ट केली. प्रा. आरती देशपांडे यांनी ‘बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील तत्वज्ञान’ या विषयावर बोलताना ग्रामीण कवितेची गंगोत्री, बावणकशी सोने, अस्सल  कविता याबद्दल विवेचन करीत, बहिणाबाईंचे संवेदनशील मन, सूक्ष्म निरीक्षण, तल्लख बुद्धी याची प्रचिती  देणाऱ्या ओळी व्याख्यानातून मांडत, बहिणाबाई संत कवयित्री कशा ठरतात  आणि  त्यांची भाषाशास्त्रीयांना अचंबित करणारी शास्त्रशुद्ध कविता कशी, हे स्पष्ट करतात.
बहिणाबाई तुका म्हणे, नामा म्हणे, असे न सांगता, अधिकारवाणीने स्वत: प्रबोधन करतात, हे त्यांनी स्पष्ट केले.   डॉ. राम पुरुषोत्तम वाईकर यांनी ‘स्वामी विवेकानंद व त्यांचे जीवन-कार्य, तर प्रा. रंजीव पैठणकर यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती व त्यांचे जीवनकार्य आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून श्रोत्यांसमोर ठेवले.  कार्यक्रमाच्या शेवटी आभार नीलकंठ रणदिवे यांनी मानले.