‘इतने चेहरों मे अपने चेहरे का निशान.. पेहचान..रामूच्याच रंगीला चित्रपटातील गाण्याच्या या ओळी. लाखो चेहऱ्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख असावी, ही इच्छा अनेकांना चित्रपटांच्या मायाजालात घेऊन येते. चित्रपट मग ते हिंदी असोत, मराठी असोत नाहीतर जगाच्या पाठीवर कुठेही घडणारा असो..‘स्ट्रगल’ हा या उद्योगाचा अविभाज्य भाग आहे. आणि इथे स्ट्रगल फक्त पडद्यावरच्या कलाकारांना करावे लागते असे नाही तर पडद्यामागे वावरणारे सगळे चेहरेही या स्ट्रगलमधूनच कधी वर येतात. कधी गुमनाम होतात. मग जिया खानसारख्या एका लब्धप्रतिष्ठित कुटुंबातून आलेल्या तरूणीने केवळ चांगल्या दर्जाचे चित्रपट मिळत नाहीत म्हणून मृत्यू जवळ का करावा? जियाची आत्महत्या हे केवळ अभिनेत्री म्हणून आलेल्या अपयशातून नाही. तर त्याला या इंडस्ट्रीत मिळणारे ग्लॅमर हवे म्हणून करावा लागणारा संघर्ष, आणि मग एकदा का तुम्ही त्या ग्लॅमरच्या झोतात आलात की त्याबरोबर येणाऱ्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, असे इथे रुळलेल्या कलाकारांचे म्हणणे आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये तर येणाऱ्या प्रत्येक चित्रपटागणिक एक नवा चेहरा दाखल होतो आहे. यात स्टार कलाकारांच्या मुलांची फौज जशी आहे तशीच नवोदित कलाकारांची संख्याही मोठी आहे. मात्र, पहिला चित्रपट हिट झाला म्हणजे आपण स्थिरस्थावर झालो, हे गणित अगदी स्टारपुत्र असलेल्या ह्रतिक रोशन आणि रणबीर कपूर यांच्या बाबतीतही खरे ठरलेले नाही. दोघांनाही आपली कारकीर्द घडवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडावी लागली. ईशा देओलला दोनदा स्वत:च चित्रपट निर्मिती करून स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न हेमामालिनीने केला. ईशानेही ‘धूम’, मणिरत्नमचा ‘युवा’ असे चांगले चित्रपट केले होते. पण, तरीही तिला यश मिळाले नाही. अखेर निराश ईशाची समजूत घालून तिचे लग्न लावून देण्यात हेमामालिनीने समाधान मानले.
‘मुन्नाभाई’ हिट झाला, ‘लगान’ मध्ये आमिरची नायिका म्हणून ती पुढे आली पण आज ग्रेसी सिंग काय करते हे कोणाला माहीत आहे? नम्रता शिरोडकर, निशा कोठारी, अंतरा माळी, प्रीती झांगियानी, किम शर्मा, सुषमा रेड्डी, समीरा रेड्डी, लिझा रे, आयेशा टाकिया, गायत्री जोशी आदींचा ठावठिकाणा तरी कोणाला माहीत आहे? त्यांनी एकतर लग्न करून आपली चित्रपट करिअर थांबवली आहे. नाहीतर क धीतरी एखाद्या भूमिकेतून त्या झळकतात. हिंदीतली कलाकारांची भाऊ गर्दी हे कारण तर मराठीत त्या संख्येने चांगले चित्रपट येत नाहीत, चांगली कामे मिळत नाहीत म्हणून तिथेही कलाकारांना स्ट्रगल करावा लागतो. विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने मराठीत कलाकार म्हणून नावलौकिक कमवायचा असेल तर तुमचे दुसरे चरितार्थाचे साधन खमके असले पाहिजे, असा सल्ला नवोदितांना दिला होता. आज हिंदीत त्यामानाने चित्रपट, जाहिराती, गाण्यांचे कार्यक्रम, मालिका असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, आपल्याला काय करायचे आहे हे निश्चित असले पाहिजे आणि चांगल्या भूमिकांसाठी संयमाने वाट पाहिली पाहिजे, असाच सल्ला जुन्यांकडून नव्यांना दिला जातो.
मिताली जगताप
रिचा चढ्ढा
विशाखा सिंग