धकाधकीच्या जीवनापासून दूर राहून निसर्गाच्या सान्निध्यात आनंद घेण्यासाठी सी.ए.सी. ऑलराऊंडरच्या वतीने विविध वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोहगाव झिल्पी येथील मैत्रबन अॅडव्हेंचर कॅम्पिंग साईटवर नुकतेच पावसाळी ट्रेकिंग व साहस शिबीर घेण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शहरातील गोंगाटापासून दूर राहून नागपूरपासून २५ कि.मी. अंतरावरील ‘मैत्रबन’ या रमणीय परिसरात पदभ्रमण केले. या जंगल भ्रमणात शिबिरार्थीना विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन झाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. उंच टेकडी आणि पावसाळ्यामुळे हिरव्यागार झालेल्या परिसरात उंचावरून पडणाऱ्या पाण्यात विद्यार्थी मनसोक्त खेळले. शिबिरार्थीनी रॅपलिंग, ऑब्स्टॅकल कोर्स, बर्मा ब्रिज, लॅडर ब्रिज, कमांडो नेट क्लायंबिंग, फन गेम्स यासारख्या साहसी खेळाचा अनुभव घेतला. जंगलात कसे वावरावे याची कलाही शिबिरार्थीनी आत्मसात केली. सी.ए.सी. ऑलराऊंडरच्या अॅडव्हेंचर कॅम्पिंग, हिमालयीन ट्रेकिंग तसेच विविध अॅजव्हेंचरची माहिती यावेळी देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी अकाऊंटिंग अॅकॅडमीचे तुषार पहाडे, सी.ए.सी. ऑलराऊंडरचे संचालक अमोल खंते, बेसिक अॅडव्हेंचर ट्रेनिंग स्कूलचे साहसी प्रशिक्षक मनीष मख, प्रणव बांडबुचे, दिनेश ईवनाते, उमेश डोंगरे, मनोज चौधरी आणि इमरान खान यांनी सहकार्य केले.
सी.ए.सी. ऑलराऊंडरतर्फे यंदाच्या मान्सूनमध्ये जंगल भ्रमंती कॅम्प, जंगल सफारी, ट्रेकिंग आणि रॉक क्लाइंबिंग कॅम्प आयोजित करण्यात आला असून इच्छुकांनी सी.ए.सी. ऑलराऊंडर कार्यालय, धन्वंतरी हॉस्पिटल, खरे टाऊन, धरमपेठ येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०९३७२३३४०६४, ०७१२-३२७१७२७ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.