नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर पालकमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. तुर्भे परिसरातील झोपडपट्टी विभागात एकहाती वरचष्मा राखणारे कुलकर्णी गेल्या काही वर्षांपासून या पदासाठी दावेदार मानले जात होते. अखेर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पालकमंत्र्यांनी या पदासाठी त्यांना उमेदवारी देऊन एकगठ्ठा मतांची तजवीज केल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकहाती वरचष्मा आहे. स्थायी समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने याच पक्षाचा उमेदवार विजयी होणार हे स्पष्टच होते. तरीही सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या कुणाकडे सोपविणार याविषयी महापालिका वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोपरखैरणे येथील ज्येष्ठ सदस्य शिवराम पाटील यांची स्थायी समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच ऐरोलीतील अपक्ष नगरसेवक एम. के. मढवी हेदेखील पालकमंत्र्यांच्या कट्टर समर्थकांमध्ये गणले जातात. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदासाठी या दोघांची नावे चर्चेत होती. असे असले तरी तुर्भे परिसरातून राष्ट्रवादीच्या पारडय़ात भरभरून मतांचे दान टाकणारे सुरेश कुलकर्णी यांनी यंदा सभापतीपदासाठी इच्छा प्रदर्शित केल्याने पालकमंत्र्यांनी त्यांना संधी दिली.
कुलकर्णी यांच्याविरोधात शिवसेनेचे मनोज हळदणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हळदणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कुलकर्णी यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. गेल्या काही महिन्यांपासून स्थायी समितीत टक्केवारीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली असताना कुलकर्णी यांच्या काळात या समितीचे कामकाज कसे चालते याविषयी उत्सुकता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2013 रोजी प्रकाशित
नवी मुंबईत स्थायी समिती सभापतीपदी सुरेश कुलकर्णी यांची निवड
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीवर पालकमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. तुर्भे
First published on: 07-05-2013 at 02:33 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh kulkarni elected on new mumbai standing committee chairman