पुरुषार्थ ही संकल्पना नव्या अर्थाने रुजवायला हवी आणि त्यासाठी विचारी, सुसंस्कृत पुरुषांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अशा लोकांना एकत्र करून ‘मेन अगेन्स्ट रेप अ‍ॅण्ड डिस्क्रिमिनेशन’ म्हणजेच ‘मर्द’ नावाची अभिनव मोहीम दिग्दर्शक फरहान अख्तरने सुरू केली. आणि काहीच दिवसांत त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. मुलाने सुरू केलेल्या या मोहिमेला वडील जावेद अख्तर यांनी शब्दांत बांधून तिला कवितेची चाल दिली. ‘मर्द’साठी जावेद अख्तर यांनी खास मराठीत गीत लिहिले असून खुद्द मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर या गीताला आपला आवाज देणार आहे.
फरहानच्या ‘मर्द’ला पाठिंबा म्हणून अनेकांनी त्याच्याकडून ही संकल्पना समजून घेतली. ‘मर्द’चे प्रतीकचिन्ह असलेले टी-शर्ट्स परिधान करणे, त्याची प्रतीकचिन्हे ठिकठिकाणी वापरणे, सोशल साइट्सवरून या मोहिमेचा प्रसार करणे अशा अनेकविध ‘मर्द’चा विचार लोकांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यात फरहानला त्याच्या माध्यमांतील सहकाऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला असून अनेक बॉलीवूड कलाकारांनी ‘मर्द’चे स्वागत केले आहे. मात्र बॉलीवूडच्या परिघाबाहेरील एका नावाने या मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनने ‘मर्द’मध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे म्हटले आहे. या ‘मर्द’ला मराठमोळा प्रतिसाद तर मिळालाच आहे. आता ‘मर्द’साठी मराठीत लिहिलेल्या जावेद अख्तर यांच्या गीतालाही सचिनच्या रूपाने मराठी आवाज मिळाला आहे. त्यामुळे सचिनचीही ‘मर्द मराठी’ भेट पुरुषार्थाचा हा नवा धडा लोकांपर्यंत पोहोचवायला नक्की मदत करेल असे म्हणायला हरकत नाही.
नजरेत चांगला भाव
घेई जो ठाव स्त्री मनाचा
राखतो मान संस्कृतीचा
देई जो नारीला सन्मान
कवितेची ही सुरुवात असून सहा-सात कडव्यांची कविता सचिन तेंडुलकरच्या आवाजात रेकॉर्ड केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tendulkar given voice to javed akhtars mard marathi