महाराष्ट्राची विविधरंगी संस्कृती, आपल्या अनोख्या कार्यकर्तृत्वाने राज्याला ललामभूत ठरणारी माणसे, राज्यात विविध ठिकाणी निरनिराळ्या क्षेत्रात विधायक काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांची दखल घेऊन, त्यांना लोकांपुढे आणून, त्यांचे ‘नेटवर्क’ उभारण्याचा प्रयत्न ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माध्यमातून ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊण्डेशन’ तीन वर्षांपासून करीत आहे. या संकेतस्थळाशी अनेकविध माणसं जोडली गेली आहेत, जोडली जात आहेत. या वेबपोर्टलचा तिसरा वर्धापनदिन ‘जागतिक पुस्तक दिना’च्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
मल्टिमीडिया स्वरुपात वर्धापनदिनाचे पहिले सत्र साजरे केले जाणार आहे. पोथ्यांचे डिजिटायझेशन करणारे नाशिकचे दिनेश वैद्य, एचआयव्ही बाधित लहान मुलांना ममतेने सांभाळणारे ‘सेवालय’ या लातूरच्या स्वयंसेवी संस्थेचे प्रा. रवी बापटले, देवगड तालुक्यातील शिरगाव येथे राहून बालएकांकिका सादर करणारे डॉ. राजेंद्र चव्हाण, कमळांचे जतन व संवर्धन करण्याचा छंद जोपासणारे चिंचवडचे सतीश गदिया आणि सेवाभावी संस्थांची माहिती एकाच ठिकाणी लोकांना मिळावी व त्यातून या संस्थांना मदत व्हावी या अनोख्या उद्देशाने प्रेरित झालेल्या वीणा गोखले या पाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती किरण क्षीरसागर पडद्यावर सादर करणार आहे. सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ या पाचही व्यक्तींशी गप्पांचा कार्यक्रम रंगविणार आहेत. महेश खरे यांचाही कार्यक्रमाच्या संचालनात मोठा सहभाग असेल.
वर्धापनदिन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दिनकर गांगल व यश वेलणकर यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे, अशी माहिती कार्यक्रम संयोजक प्रवीण शिंदे व अतुल तुळशीबागवाले यांनी दिली. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचा या पुस्तकात समावेश असून वर्धापनदिन कार्यक्रमाच्या वेळी ते सवलतीत उपलब्ध करून देण्यात येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third anniversary of think maharashtra will be celebrated with cultural programmes