मुंबईमधील मॉल्स, मोठी दुकाने, तसेच फेरीवाल्यांच्या स्टॉल्समध्ये अंतर्वस्त्रांच्या विक्रीच्या निमित्ताने मांडण्यात येणारे स्त्रीदेहाचे पुतळे व्यभिचारास प्रवृत्त करत असल्याने अशा पुतळ्यांच्या प्रदर्शनास बंदी आणावी या मागणीसाठी महापालिकेतील सर्व नगरसेवक पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत. कपडय़ांच्या जाहिरातबाजीसाठी दुकानांच्या दर्शनीभागात स्त्रीयांचे पुतळे किंवा अर्धपुतळे वापरण्यास मज्जाव करावा, अशी आग्रही मागणी २२७ नगरसेवकांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
दुकानांच्या दर्शनी भागात मांडण्यात येणाऱ्या स्त्रीदेहाच्या अशा प्रदर्शनामुळे महिलांमध्ये लाज उत्पन्न होते, व तेथून मान खाली घालून पुढे जावे लागते, तर विकृत, आंबटशौकिनांचे घोळके अशा ठिकाणी रेंगाळतानाही दिसतात. महिलांच्या दृष्टीने ही अपमानास्पद बाब आहे. त्यामुळे कपडय़ांच्या विक्रीच्या निमित्ताने स्त्रीदेहाचे प्रदर्शन मांडणारे पुतळे, अर्धपुतळे आदी दुकानात ठेवण्यास बंदी करावी, तसेच ही बंदी न जुमानणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे रितू तावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. या ठरावाच्या सूचनेस २२७ नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात मांडण्यापूर्वीच रितू तावडे यांनी आपल्या प्रभागातील दुकानांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेले स्त्रीदेहाचे पुतळे, अर्धपुतळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, कपडे विक्रीच्या निमित्ताने स्त्रीदेहाचे अश्लील दर्शन घडत असून त्यामुळे बलात्कार, विनयभंगासारख्या कृत्यांना खतपाणी मिळते. त्यामुळे मॉल्स, दुकानांमधील असे पुतळे तात्काळ हटविणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करीत महापौर सुनील प्रभू यांनी ही ठरावाची सूचना पुढील अभिप्रायासाठी सीताराम कुंटे यांच्याकडे पाठवून दिली.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2013 रोजी प्रकाशित
‘शो केस’मधील स्त्रीदेहाचे प्रदर्शन बंद करा..!
मुंबईमधील मॉल्स, मोठी दुकाने, तसेच फेरीवाल्यांच्या स्टॉल्समध्ये अंतर्वस्त्रांच्या विक्रीच्या निमित्ताने मांडण्यात येणारे स्त्रीदेहाचे पुतळे व्यभिचारास प्रवृत्त करत असल्याने अशा पुतळ्यांच्या प्रदर्शनास बंदी आणावी या मागणीसाठी महापालिकेतील सर्व नगरसेवक पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत.
First published on: 29-05-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To fight sex crimes bmc wants lingerie mannequins banned