एकीकडे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दुसऱ्याची गैरसोय होते, हे ध्यानात घेतले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये असे आवाहन करताना, वाहतूक नियमांचा समावेश अभ्यासक्रमात झाल्यास समाजामध्ये विशेषत: भावी पिढीमध्ये वाहतूक नियमांबाबत साक्षरता निर्माण होईल, असा विश्वास कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी व्यक्त केला.
राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१३ च्या निमित्ताने मलकापूर येथील नामदार आनंदराव चव्हाण विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, महाराष्ट्र ट्रक, टेंपो असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी, डॉ. सतीश शिंदे, डॉ. दिलीप सोळंकी महामार्ग वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, बाळासाहेब कोळी, शहर वाहतूक शाखेच्या उपनिरीक्षक विद्या जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.
मितेश घट्टे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. ज्या गावात चांगले रस्ते आहेत त्या गावात विकास होऊन सुरक्षितता निर्माण झाली आहे. वाहतुकीचे सर्वागीण नियमन करणारी पोलीस यंत्रणा आहे.
डॉ. आबासाहेब पवार म्हणाले की, जीवनाचे मोल खूप आहे. अपघातात मृत्यू होणे ही बाब दुर्दैवी असून, वाहन चालवताना रस्त्याची परिस्थिती पाहून काळजीपूर्वक ते चालवावे. सर्व वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही काळाची गरज आहे.
प्रकाश गवळी म्हणाले की, वाहतूक सुरक्षिततेबाबतचे प्रबोधन हे तात्पुरत्या स्वरूपाचे न राहता कायमस्वरूपी व्हावे, रस्ता सुरक्षेबाबतच्या यंत्रणेला चांगल्या प्रकारची कार्यवाही करता यावी यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे.
अशोकराव थोरात म्हणाले की, महामार्गालगत असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अपघाताला सामोरे जावे लागते. त्यासाठी शासनाने मुलांच्या सुरक्षिततेसंबंधी जागृती निर्माण केली पाहिजे. प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोळी यांनी केले. डॉ. सतीश शिंदे, डॉ. दिलीप सोळंकी, पक्षीतज्ज्ञ नाना कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय फडतरे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक आर. आर. पाटील यांनी आभार मानले.