मेच्या मध्यावर दुष्काळाची तीव्रता शिगेला पोहोचली असून सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रात तब्बल ४४० गावे व ६९४ वाडय़ांना ४२६ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागत आहे. अडीच महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या सुमारे तिप्पटीने वाढली आहे. उन्हाची तीव्रता काहिशी कमी होत असली तरी दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या सर्वसामान्यांना आता सर्वाना प्रतीक्षा आहे, ती केवळ मान्सूनची.
गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे त्याची झळ उत्तर महाराष्ट्रास हंगाम संपुष्टात आल्यानंतर लगेच बसू लागली होती. त्यानंतर उन्हाचा तडाखा जसजसा वाढू लागला तसतसे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी दिवसागणिक वाढत गेली.
मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्रातील १४६ गावे व २२७ वाडय़ांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी तेव्हा १७० टँकर कार्यान्वित होते. पुढील काळात हे चित्र आमुलाग्र बदलले. म्हणजे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांची संख्या थोडी थोडकी नव्हे, तर तिप्पटीने वाढल्याचे लक्षात येते. मेच्या मध्यावर टंचाई शाखेने दिलेल्या माहितीवरून ही बाब स्पष्ट होते.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात पाण्याची मोठय़ा प्रमाणात टंचाई भेडसावत आहे. खरेतर धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख. परंतु, दुष्काळाने त्यास छेद दिला. सध्या या एकाच जिल्ह्यातील २८८ गावे व ६९४ वाडय़ांना २८९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यानंतर क्रमांक आहे, तो जळगाव जिल्ह्याचा. तेथील १४६ गावांना १३१ टँकरने पाणी देण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात ६ गावांसाठी सहा टँकर सुरू आहेत. केवळ नंदुरबार जिल्ह्यात आजतागायत एकही टँकर सुरू करावा लागला नसल्याची माहिती टंचाई शाखेने दिली. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या या भागातही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. परंतु, या भागातील लोकवस्ती विखुरलेली असल्याने तेथे या पर्यायाची अंमलबजावणी करणे बहुदा प्रशासनाला शक्य झाले नसावे. यंदा उत्तर महाराष्ट्रातील टंचाईग्रस्त गावे व टँकरची संख्या काही वर्षांत संख्या सर्वाधिक ठरली आहे.
शासनाने टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर करताना हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर केलेल्या तालुक्यात मंडळस्तरावर एक चारा छावणी उघडण्याचे सूचित केले होते. परंतु, त्याची आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही. कारण, या भागातील एकाही जिल्ह्यात गुरांसाठी चारा छावणी उघडली गेली नाही. दरम्यान, टळटळीत उन्हामुळे सलग तीन महिन्यांपासून उंचावणारे तापमान काहिसे कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तापमानात घट झाली असली तरी पावसाचे आगमन वेळेवर व्हावे, यासाठी सर्वाचे आकाशाकडे डोळे लागले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
अडीच महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या तिप्पट
मेच्या मध्यावर दुष्काळाची तीव्रता शिगेला पोहोचली असून सद्यस्थितीत उत्तर महाराष्ट्रात तब्बल ४४० गावे व ६९४ वाडय़ांना ४२६ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागत आहे. अडीच महिन्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या सुमारे तिप्पटीने वाढली आहे.
First published on: 16-05-2013 at 12:52 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Triples the number of villages under water shortage within two and half month