महिला रेल्वे प्रवाशांच्या छेडछाड आणि विनयभंगाच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतली असून महिलांची छेडछाड करणाऱ्या रेल्वेरोमिओना अक्षरश: झोडपून काढण्याचे आदेश पाटील यांनी रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांना सोमवारी दिले.
उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची टपोरींकडून छेडछाड होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. दरवाज्यात लटकणारे ‘रोमिओ’ स्थानकात उभ्या असलेल्या तसेच रेल्वेच्या दरवाज्यात उभ्या राहणाऱ्या महिलांची टिंगळ टवाळी करीत असातात. मात्र त्याकडे रेल्वे पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महिला प्रवाशांकडून वारंवार केला जातो. गेल्या दोन महिन्यांत तिन्ही रेल्वे मार्गावर महिलांवरील हल्यांच्या चारपाच घटना घडल्या. भर दिवसा उजेडी एका अमेरिकी महिलेवर हल्लाही झाला होता. तर लोअर परळ स्थानकात चालत्या गाडीत एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न झाला होता. गेल्या काही दिवसांत सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या आर.आर. पाटील यांनी महिलांचा विनयभंग करणाऱ्या टपोरींना चांगलीच अद्दल घडविण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना दिले आहेत.
रेल्वेतून जाताना स्टंटबाजी करणाऱ्या तसेच महिलांची टिंगल टवाळी करणाऱ्यांना सरळ लोकांसमोरच झोडपून काढा, कोणाचाही गय करू नका, मानवाधिकाराबाबत काही प्रकरण घडले तर आपल्याकडे पाठवा, मात्र रेल्वे रोमिओंना झोडपून काढा. असे थेट आदेशच पाटील यांनी रेल्वे आयुक्तांना दिले आहेत. या मोहिमेसाठी रेल्वे पोलीस दलात आणखी १०० पोलीस आणि गृहरक्षक दलाचे १०० जवान मदतीला देण्यात आले आहेत.