पुन्हा एकदा गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील निफाड, देवळा, येवला, बागलाण, मालेगाव आसपासच्या परिसरांत द्राक्ष, कांदा, गहू व डाळिंब आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी कोलमडून पडल्याचे चित्र आहे. या अस्वस्थेत निफाडच्या रुई गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनी मनोऱ्यावर चढून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला. संबंधितांची भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देऊन प्रशासनाने संबंधितांची मनधरणी केली. साधारणत: तीन तासांनंतर मनोऱ्यावर चढलेल्या आंदोलकांना खाली उतरविण्यात यश आले. दुसरीकडे नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. निफाड तालुक्यातील १० ते १५ गावांत काढणीवर आलेल्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून गारपिटीचा तडाखा इतका जबरदस्त होता की, मजबूत लोखंडी खांबांवर उभ्या असणाऱ्या शेडनेटचा निभाव लागला नाही. द्राक्ष व डाळिंब बागांची अवस्था तर एका दिवसात सारे झडल्यासारखी झाली. दुसऱ्या दिवशीही काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावून अस्वस्थता वाढविली.
२०१४ हे वर्ष जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्तींचा वारंवार फटके देणारे ठरले. वर्षांच्या सुरुवातीपासून अवकाळी पाऊस, गारपीट यांचा मारा अव्याहतपणे चाललेल्या माऱ्याने अखेरच्या टप्प्यात देखील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. मागील महिन्यात अवकाळी पावसाने २० हजार एकरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात गुरुवारच्या पावसाने काही विशिष्ट भागांत अक्षरश: कहर केला. निफाड हा बागायती पिकांचा परिसर. द्राक्षबागांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील रुई, धारणगाव, देवगाव, कोळगाव, नांदुरमध्यमेश्वर अशा काही गावांत तासाभराच्या गारपिटीने पिके होत्याची नव्हती झाली. बहुतांश ठिकाणी द्राक्षबागा काढणीस लवकरच सुरुवात होणार होती. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी चालविली असताना नैसर्गिक आपत्ती कोसळली. गारपिटीत द्राक्षमणी फुटले. अनेक ठिकाणी द्राक्षमण्यांचा खच साचला. वेलीची पानेही झडून गेल्यामुळे काही बागा उघडय़ाबोडक्या झाल्या. काही बागांमध्ये फुटलेले मणी वेलीवर लटकत होते. पण, मणी व द्राक्षवेली पुढील काही दिवसांत सडून जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गहू, कांदे व पपईचे मोठे नुकसान झाले. नुकसानीमुळे हबकलेले शेतकरी सकाळपासून जमा होऊ लागले. शासनाकडून तातडीने भरीव मदत मिळाली पाहिजे, या मागणीसाठी १५० ते २०० शेतकरी रुई गावातील भ्रमणध्वनी मनोऱ्याच्या जवळ जमले. आपल्या मागणीसाठी त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा देऊन मनोऱ्यावर चढू लागले. सकाळी अकरापर्यंत ५० ते ७० शेतकरी या मनोऱ्यावर उंचावर जाऊन बसले. दरम्यानच्या काळात पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मनोऱ्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा संबंधितांकडून दिला जात असल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली. राज्य शासनाने मराठवाडा व विदर्भातील नुकसानग्रस्तांसाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केली. निफाड हा महाराष्ट्रातील भाग असून इतरांना वेगळा न्याय लावला जात असल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. नैसर्गिक आपत्तीनंतर पंचनामे करून शासन पिकांचे किती टक्के नुकसान झाले याचा अंदाज बांधते. त्यानुसार द्राक्षबागेतील सध्याच्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल. परंतु, नुकसान झालेल्या बागांवर भविष्यात फलधारणा होणार नाही. या बागा आता उखडून टाकण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे द्राक्षबागांचे १०० टक्के नुकसान गृहीत धरून नुकसानभरपाई देण्याची मागणी आंदोलकांनी केली. महसूल अधिकाऱ्यांनी सर्वाची समजूत काढत मनोऱ्यावरून खाली उतरण्याची विनंती केली. आपल्या भावना शासनाकडे पोहोचविल्या जातील तसेच नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सकाळपासून हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. साधारणत: तीन तासांनंतर आंदोलक खाली उतरले. शुक्रवारी अधूनमधून काही भागांत पावसाचे अस्तित्व अधोरेखित होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. निफाडप्रमाणे देवळा तालुक्यात डाळिंब बागांचे नुकसान झाले. तालुक्यातील वासोळपाडा, देवपूरपाडे, महालपाटणे, निंबोळा, वाखारी आदी गावांत मुख्यत्वे हे नुकसान झाले. तहसीलदार शर्मिला भोसले व कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अनेक गावांमध्ये १०० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनाम्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गारपिटीचा तडाखा शेतातील जनावरांनाही बसला. काही ठिकाणी शेतातील उघडय़ावर पडलेले पीव्हीसी पाइप, वासोळपाडे येथील शाळेचे सिमेंटचे पत्रे, घरावरील सोलर यंत्रणा व कौलारू घरांचे कौलेदेखील फुटले.

चार हजार हेक्टरचे नुकसान
गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्षबागांचे झाले आहे. निफाड तालुक्यात २५०० हेक्टर द्राक्षबागा गारपिटीने बाधीत झाल्या. बागलाण तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब तर ११.५ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. देवळा, मालेगाव, येवला तालुक्यातही डाळिंब, कांदा, गहू या पिकांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

भुईसपाट द्राक्षबाग उखडावी लागणार
गुरुवारी सायंकाळी निफाड परिसरात झालेल्या गारपिटीने असे काही नुकसान झाले की फुललेल्या द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. वेलींवरील द्राक्ष व पानेही झडून गेली. गारांच्या फटकाऱ्याने द्राक्षवेली सडल्या असून त्या उखडून टाकण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. द्राक्ष बागांसह कांदा व गव्हाचेही प्रचंड नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. आता जगायचे कसे, हा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोरील प्रश्न आहे.
– प्रवीण भालेराव
(शेतकरी, धारणगाव, निफाड)

तासाभरात सारे काही उद्ध्वस्त
बँक आणि खासगी सावकारांकडून कर्जाऊ पैसे घेऊन एक एकर क्षेत्रात उभारलेले आपले शेडनेट आणि हाताशी आलेले सिमला मिरचीचे पीक तासाभराच्या गारपिटीने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शेडनेट उभारण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला. दोन महिन्यांपूर्वी सिमला मिरचीची लागवड केली होती. पुढील काही दिवसात पीक काढण्यास सुरुवात होणार असताना हे संकट कोसळले. गारपिटीचा मारा इतका जबरदस्त होता की, शेडनेटचे लोखंडी अँगल आडवे झाले. विशिष्ट कापडाचे असणारे आच्छादन होत्याचे नव्हते झाले. गारपिटीने आपले सर्वस्व हिरावून नेले. शेटनेटमधील पीक नेस्तनाबूत झाले असताना उघडय़ावरील द्राक्ष बाग कशी तग धरणार ? द्राक्ष बागेचेही १०० टक्के नुकसान झाले.
– दगू गायकवाड (शेतकरी, रुई, निफाड)