मुंबईतल्या मैदानांवर, कट्टय़ांवर सुट्टीच्या दिवशी मोठय़ांसाठी रंगणारे सामाजिक, सांस्कृतिक सोहळे अनेक आहेत. पण, यंदाच्या आठवडी सुट्टीत खास लहान मुलांसाठीचा सांस्कृतिक सोहळा वांद्रे येथील ‘महाराष्ट्र नेचर पार्क’मध्ये रंगणार आहे. गंमत म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘ग्रूमिंग बेबीज ग्लोबल’ या उपक्रमाची पहिलीच ‘थीम’ मुलांच्या पालनपोषणात ‘बाबां’चे महत्त्व अधोरेखित करणारी असेल. कारण, या सर्व उपक्रमांचा आनंद मुलांसमवेत बाबांनाही घेता येणार आहे. आयांसाठी सुखाचे म्हणजे आयांना यावेळी थोडासा निवांतपणा मिळावा असा खास ‘कोपरा’ कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवण्यास आयोजक महिला विसरलेल्या नाहीत.
मुलांना गंमत वाटेल असे कार्यक्रम, कार्यशाळा आयोजून भारतीय संस्कृती, तिची परंपरा आणि पर्यावरण यांचे महत्त्व बालमनावर रुजविण्याच्या दृष्टीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय ग्रामीण संस्कृतीतील पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व लक्षात घेऊन या सोहळ्याचे नामकरण ‘पिंपळाच्या वृक्षाखाली’ (अंडर दी पिपल ट्री) असे करण्यात आले आहे.
‘ग्रूमिंग बेबीज’चा हा पहिलाच प्रयोग. मुलांच्या बौद्घिक विकासाबरोबरच त्यांचा मानसिक आणि भावनिक विकास कसा व्हावा, या उद्देशाने या महिलांनी या संस्थेची स्थापना केली. या पहिल्या प्रयोगाचा भर बाबा आणि मुलांमधले अनुबंध वाढविण्यावर असणार आहे. १५ आणि १६ फेब्रुवारीला सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हा सोहळा रंगेल. बालवाडीत जाणाऱ्या मुलांना समजेल अशा पद्धतीने भारतीय पारंपरिक कला प्रकारांची ओळख करून देणे, त्यांच्यात पर्यावरणाची आवड निर्माण करणे या उद्देशाने आम्ही छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन या सोहळ्यात केले आहे, अशी माहिती ‘ग्रूमिंग बेबीज ग्लोबल’च्या संस्थापक सदस्य ऑन्ड्रिला पुरोहित यांनी दिली.
‘विविधतेत एकते’चे महत्त्व सांगणाऱ्या पथनाटय़, पपेट शो, डफ, एकतारा, बासरी आदी पारंपारिक वाद्यांची ओळख करून देणारे संगीत सादरीकरण, चित्रपटांवर कार्यशाळा, सायकल फेरी आदी मुलांना आवडतील अशा कार्यक्रमांची रेलचेल यात असेल. इंडिया बाझार या कार्यक्रमात ब्लॉक प्रिंटींग, कठपुतली आदींची मजा मुलांना लुटता येईल. कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्त्वाची ओळख करून देणाऱ्या नृत्यनाटिकेने होईल.
बाबाच का?
लहान मुलांना भरविण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्यापर्यंतच्या कामात आयांचा सहभाग मोठा असतो. वेळेअभावी, कामातील ताणतणावांमुळे वडिलांचा या सगळ्यातील सहभाग फारच कमी असतो. त्यामुळे, लहान मुलांना वडिलांचा सहवासही कमीच लाभतो. त्यामुळे, मुलांचे पित्याशी म्हणावे तसे अनुबंध जुळले जात नाहीत. या उपक्रमाच्या निमित्ताने बाबांनी आपले सेलफोन, दूरचित्रवाणी, मॉलमधील खरेदी यांना फाटा देऊन निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या मुलांसमवेत मौजमजा करावी.
वीणा दंडपाणी, संचालक, ग्रूमिंग बेबीज
आयांचाही कोपरा
बाबामंडळी आपल्या मुलांसमवेत मजा करीत असतानाच आयांना त्यांच्यासाठी थोडा वेळ मिळावा या दृष्टीने या सोहळ्यात खास आयांकरिता मनोरंजनाचा एक कोपरा असणार आहे. मुले आणि करिअर यांत अडकलेल्या आयांना थोडे निवांत होता यावे, यासाठी हा कोपरा असणार आहे.
राजेंद सिंग यांचे धडे
वांद्रयातील ज्या नेचर पार्कमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तिथे बाजूनेच मिठी नदीही वाहते. याचे औचित्य साधत आयोजकांनी कार्यक्रमाला जलतज्ज्ञ आणि मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांना आमंत्रित केले आहे. ते ‘पाण्याचे पर्यावरण’ या विषयावर मुलांशी गप्पागोष्टींच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.