विदर्भात पावसाळ्याअखेर बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा झाला खरा, पण औद्योगिक आणि सिंचनाच्या वापरात हा जलसाठा झपाटय़ाने कमी होत चालला आहे. गेल्या तीन महिन्यात मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा एकूण पाणीसाठा २६ टक्क्यांनी कमी झाला आहे. डिसेंबरअखेर या सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा ५६ टक्क्यांवर आला आहे.
 सप्टेंबरअखेर नागपूर विभागातील सर्व ३६६ प्रकल्पांमध्ये ३ हजार ५७३ दशलक्ष घनमीटर (९१ टक्के) आणि अमरावती विभागातील ३६५ प्रकल्पांमध्ये २ हजार २२५ दलघमी (७३ टक्के) पाणीसाठा झाला होता. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्य़ाचा अपवाद वगळता सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी साठवले गेले. सर्वसाधारणपणे दर आठवडय़ात सिंचन प्रकल्पांमधून विविध वापरासाठी दोन टक्क्यांपर्यंत पाणी सोडले जाते. विदर्भातील काही प्रकल्पांमधून हा वापर १५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. औद्योगिक प्रयोजनासाठी धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम जलसाठय़ावर जाणवू लागला आहे. डिसेंबर अखेपर्यंत नागपूर विभागात २ हजार १९७ दलघमी (५६ टक्के) आणि अमरावती विभागात १ हजार ७११ दलघमी (५६ टक्के) पाणीसाठा अशी अवस्था झाली आहे. विदर्भातील २५ मोठय़ा प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांमध्ये यंदा पुनर्वसन आणि इतर कारणांमुळे पूर्ण क्षमतेने पाणी अडवले गेले नव्हते. अनेक प्रकल्प तुडूंब भरले होते. सप्टेंबर अखेपर्यंत १६ प्रकल्पांमध्ये तर १०० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यात तोतलाडोह, कामठी खरी, निम्न वेणा नांद, वडगाव, इटियाडोह, शिरपूर, कालीसरार, आसोलामेंढा, धाम, पोथरा, अप्पर वर्धा, पूस अरूणावती, वाण या प्रकल्पांचा समावेश होता.
या मोठय़ा प्रकल्पांमधून पाणी झपाटय़ाने कमी होत चालले आहे. गेल्या आठवडाभरात कामठी खरी प्रकल्पाचा पाणीसाठा १७ टक्क्यांनी, धाम, काटेपूर्णाचा ५ टक्क्यांनी, अप्पर वर्धा, बोर, नांद, वडगाव या धरणांमधील पाणीसाठा चार टक्क्यांनी कमी झाला आहे. सर्व प्रकल्पांचा जलसाठा एकाच आठवडय़ात दोन टक्क्यांनी घटला आहे.अमरावती विभागातील काटेपूर्णा, नळगंगा, बेंबळा या प्रकल्पांमध्ये पावसाळयाअखेर पुरेसा साठा झाला नव्हता. तरीही या प्रकल्पांमधून वेगाने पाणी कमी होत चालले आहे.
नागपूर विभागात कालीसरार प्रकल्पामध्ये तर केवळ ११ टक्के पाणी आहे. पेंच रामटेक, नांद, आसोलामेंढा, बोर या धरणांमधील पाणीसाठादेखील झपाटय़ाने घटला आहे.  विदर्भातील २५ मोठय़ा सिंचन प्रकल्पांमध्ये तीन महिन्यांपूर्वी ८१ टक्के पाणीसाठा होता, तो आता ५७ टक्क्यांवर आला आहे. मध्यम प्रकल्पांचा पाणीसाठा ८७ टक्क्यांवरून ५५ वर आणि लघु प्रकल्पांमधील साठा ८३ वरून ४९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. या धरणांवर विसंबून असलेल्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची तीव्रता यंदा फारशी जाणवणार नसली, तरी पाण्याचा काटकसरीने वापर होण्याची आवश्यकता आहे.
विदर्भातील मोठय़ा सिंचन  प्रकल्पांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे: अप्पर वर्धा ७२ टक्के, पूस ८६, अरुणावती ७१, बेंबळा ३३, काटेपूर्णा ५३, वान ८७, नळगंगा १२, पेनटाकळी २, पेंच तोतलाडोह ६९, कामठी खरी ६१, पेंच रामटेक ३०, नांद २५, वडगाव ६३, इटियाडोह ७५, शिरपूर ६६, पुजारीटोला २९, कालीसरार ११,   आसोलामेंढा ३२, बोर ३९, धाम ५९, पोथरा ५१, लोअर वर्धा   ५४,  गोसीखुर्द ६८ टक्के.